कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत मोठी घट; १०१ जणांचा मृत्यू

महाराष्ट्रात कोरोनाबाधितांच्या संख्येत रविवारच्या तुलनेत सोमवारी मोठी घट झाल्याचे पाहायला मिळाले. रविवारी ९ हजार ९७४ नवे कोरोनाबाधित रुग्ण सापडले होते. सोमवारी मात्र ६ हजार ७२७ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली. त्यामुळे आता एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ६० लाख ४३ हजार ५४८ झाली असून अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या १ लाख १७ हजार ८७४ इतकी झाली आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ४,१२,०८,३६१ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६०,४३,५४८ (१४.६५ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ६,१५,८३९ व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये असून ४२४५ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

१०१ जणांचा मृत्यू

कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत घट होत असतानाच मृतांची संख्याही कमी होत आहे. रविवारी १४३ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता, तर सोमवारी १०१ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. आज नोंद झालेल्या एकूण १०१ मृत्यूंपैकी ८६ मृत्यू हे मागील ४८ तासातील, तर १५ मृत्यू हे मागील आठवड्यातील आहेत. राज्यात आतापर्यंत १ लाख २१ हजार ५७३ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.०१ टक्के एवढा आहे.

५ हजार ८९० रुग्ण बरे

तसेच सोमवारी राज्यात कोरोनाबाधितांपेक्षा बरे झालेल्या रुग्णांचे प्रमाण अधिक होते. आज १० हजार ८१२ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण ५८,००,९२५ कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५.९९ टक्के एवढे झाले आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे ९५ टक्क्यांच्या वर कायम राहिले आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*