नितीन देसाई यांच्या एनडी स्टुडिओला भीषण आग

हिंदी चित्रपटसृष्टीमधील प्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांच्या कर्जतमधील स्टुडिओला भीषण आग लागली आहे. एनडी स्टुडिओ येथे शुटींगसाठी तयार करण्यात आलेल्या सेटला आग लागल्याची माहिती समोर येत आहे. कर्जत नगरपालिकेच्या अग्निशामन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून दुपारी अडीचच्या सुमारास शेवटची माहिती हाती आली तेव्हा आग विझवण्याचा प्रयत्न सुरु होते.

रायगडमधील कर्जत येथे असणाऱ्या एन. डी. स्टुडिओच्या भव्यदिव्य आवारात ही ‘फिल्मी दुनिया’ हे चित्रपट थिमवर आधारीत पार्कही येथे आहे. या ठिकाणी या फिल्मी दुनियेत अनेक सुप्रसिद्ध हिंदी आणि मराठी सिनेमाचे सेट आहेत. मात्र सध्या लागलेली आग ही नवीन मालिकेच्या चित्रिकरणासाठी उभारण्यात आलेल्या सेटला लागल्याची माहिती मिळत आहे. सध्या ही आग अटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. आग नक्की कशामुळे लागली हे स्पष्ट होऊ शकलेलं नाही असं सांगतिलं जात असलं तरी वणव्याच्या आगीमधूनच हा सेट जळाल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. धुराचे लोट बऱ्याच दूरवरुनही दिसत असल्याने आग भीषण असल्याचे सांगितले जात आहे. या आगीत पूर्ण सेट जळून खाक झालाय.

मिळालेल्या माहितीनुसार या स्टुडिओच्या मागील बाजूला असणाऱ्या जंगल परिसरामध्ये वणवा पेटला होता. नंतर ही आग स्टुडिओ परिसरामध्ये पसरली आणि तिने भीषण रुप धारण केलं. जोधा अकबर या चित्रपटासाठी उभारण्यात आलेला किल्ल्याचा सेट काही प्रमाणात या आगीत जळाला आहे. एकूण नुकसान किती झालं यासंदर्भात दुपारी तीन वाजेपर्यंत कोणतीही अधिकृत माहिती हाती आलेली नाही.

सुकलेल्या गवतामुळे आग पसरली

एन. डी. स्टुडिओच्या पाठीमागील बाजूला मोठ्या प्रमाणात सुकलेले गवत वणव्यामुळे पेटले. त्याची वेळीच दखल न घेतल्याने स्टुडिओच्या आतील भागातील गवत जळत जोधा अकबर चित्रपटासाठी बनवलेल्या किल्ल्याच्या सेटपर्यंत आग पोहोचली. त्यात सेटच्या काही भागाला आग लागली. यामध्ये अद्याप कोणत्याही जीवितहानीचे वृत्त नाही.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*