मंगळवार, १० नोव्हेंबर २०२६ f ◎ 𝕏 ▶

पत्रकार शशिकांत वारीशे हत्या प्रकरण: मुख्य संशयित पंढरीनाथ आंबेरकरचे दोन्ही जामीन अर्ज फेटाळले

पत्रकार शशिकांत वारीशे हत्या प्रकरण: मुख्य संशयित पंढरीनाथ आंबेरकरचे दोन्ही जामीन अर्ज फेटाळले

रत्नागिरी : येथील पत्रकार शशिकांत वारीशे यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी पंढरीनाथ आंबेरकर याला जामीन मिळवण्यात पुन्हा अपयश आले आहे. रत्नागिरीच्या अतिरिक्त सत्र न्यायालयाने त्याचे दोन्ही जामीन अर्ज फेटाळून लावले आहेत.

अतिरिक्त सत्र न्यायाधीश ए. एम. आंबळकर यांनी २७ ऑक्टोबर २०२६ रोजी दिलेल्या या निर्णयामुळे आंबेरकरचा तुरुंगातील मुक्काम कायम राहणार आहे. जामिनासाठी आंबेरकर याने ४९ परिच्छेदांचा सविस्तर अर्ज दाखल करत आरोग्याची कारणे आणि काही साक्षीदार फितूर झाल्याचा मुद्दा उपस्थित केला होता, मात्र न्यायालयाने बचाव पक्षाचे सर्व युक्तिवाद अमान्य केले.

अभियोग पक्षाच्या माहितीनुसार, कोडवली येथील हॉटेल सरस्वतीजवळ पंढरीनाथ आंबेरकर याने आपली महिंद्रा थार गाडी विरुद्ध दिशेने चालवत शशिकांत वारीशे यांच्या दुचाकीला जाणीवपूर्वक धडक दिली होती, ज्यात गंभीर जखमी झालेल्या वारीशे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

वारीशे यांनी आंबेरकर याच्या विरोधात तसेच रिफायनरी प्रकल्पाशी संबंधित आरोपांवर आधारित लेख प्रसिद्ध केला होता. याच वैमनस्यातून अपघाताचा बनाव करून त्यांची हत्या करण्यात आल्याचा ठपका तपास यंत्रणेने ठेवला आहे.

जामीन अर्जावर सुनावणीदरम्यान बचाव पक्षाने आंबेरकर याच्या मधुमेह, उच्च रक्तदाब आणि अँजिओप्लास्टीसह इतर गंभीर आजारांचा उल्लेख करत खासगी रुग्णालयात उपचारांची मागणी केली.

तसेच, खटल्यातील काही प्रत्यक्षदर्शी साक्षीदार प्रतिकूल झाल्याने आपल्याविरुद्धचा पुरावा कमकुवत झाल्याचा दावाही केला. यावर सरकारी पक्षाने कडाडून विरोध करत खटल्याचे गांभीर्य न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.

अनेक महत्त्वाच्या साक्षीदारांची साक्ष अद्याप नोंदवायची असून, आरोपीची राजकीय क्षेत्रातील ओळख आणि रिफायनरी परिसरातील जमिनींचे व्यवहार पाहता जामीन मिळाल्यास साक्षीदारांवर दबाव येण्याची दाट शक्यता असल्याचे सरकारी वकिलांनी स्पष्ट केले.

विशेष बाब म्हणजे, आंबेरकरपासून जीवाला धोका असल्याची भीती व्यक्त करणारे तब्बल ४७ अर्ज स्थानिक नागरिकांनी पोलिसांकडे दिल्याची धक्कादायक माहितीही तपास अधिकाऱ्यांनी न्यायालयात मांडली.

दोन्ही बाजूंचे युक्तिवाद ऐकल्यानंतर, केवळ काही साक्षीदार प्रतिकूल झाले म्हणून संपूर्ण खटला संपुष्टात येत नाही आणि सुनावणीच्या या टप्प्यावर पुराव्यांचे अंतिम मूल्यमापन करणे योग्य नाही, असे स्पष्ट करत न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळले.

आरोपीच्या उपचारांसाठी भविष्यातही पोलीस बंदोबस्तात रत्नागिरीतील खासगी रुग्णालयात व्यवस्था केली जाऊ शकते, असेही न्यायालयाने स्पष्ट केले असून प्रकरणाचे गांभीर्य आणि साक्षीदारांच्या सुरक्षेच्या कारणास्तव हे अर्ज नामंजूर करण्यात आले आहेत.

Additional Sessions Court, Bail Plea Rejected, Journalist Shashikant Warishe, Maharashtra Crime News, murder case, Pandharinath Amberkar, Ratnagiri Crime News, Refinery Project

माय कोकण टीम

Similar Posts

View All

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *