रत्नागिरी : जिल्ह्यातील मौजे मार्गताम्हाणे खुर्द पैकी सुतारवाडी येथे एका विहिरीत पडलेल्या दुर्मिळ पिसोरी हरणाची (माऊस डिअर) वन विभागाच्या पथकाने सुरक्षितपणे सुटका केली.
७ नोव्हेंबर रोजी घडलेल्या या घटनेनंतर हरणाची वैद्यकीय तपासणी करून त्याला पुन्हा त्याच्या नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्यात आले आहे.
सुतारवाडी येथील रहिवासी प्रताप सुर्वे यांच्या मालकीच्या आंबा-काजू बागेतील विहिरीमध्ये एक वन्यप्राणी पडल्याचे त्यांच्या निदर्शनास आले होते.
त्यानंतर त्यांनी तात्काळ या घटनेची माहिती चिपळूणचे वनपाल एस. एस. सावंत यांना दिली. माहिती मिळताच सावंत यांच्यासह रामपूरचे वनरक्षक राहुल गुंठे, कोळकेवाडीचे वनरक्षक कृष्णा इरमले आणि बचाव पथकाचे सदस्य अथर्व घाग यांनी घटनास्थळी धाव घेतली.

सुरुवातीला हा प्राणी ससा असावा असा अंदाज होता, मात्र जवळून पाहणी केली असता ते अतिशय दुर्मिळ असे पिसोरी हरीण असल्याचे बचाव पथकाच्या लक्षात आले.
हरणाला सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी वन विभागाच्या पथकाने बचाव कार्य सुरू केले. माणसांची चाहूल लागताच घाबरलेल्या हरणाने विहिरीतील पाण्यात उडी मारून पोहण्यास सुरुवात केली.
मात्र, बचाव पथकाने अथक प्रयत्न करत जाळीच्या साहाय्याने त्याला सुखरूप बाहेर काढले. त्यानंतर हरणाला पिंजऱ्यात ठेवून त्याची प्राथमिक वैद्यकीय आणि शारीरिक तपासणी करण्यात आली.
हरीण पूर्णपणे सुस्थितीत व निरोगी असल्याची खात्री झाल्यानंतर वरिष्ठांच्या आदेशानुसार त्याला सुरक्षितपणे नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले.
रत्नागिरीच्या विभागीय वन अधिकारी गिरिजा देसाई, सहाय्यक वनसंरक्षक प्रियंका लगड आणि चिपळूणचे वनपरिक्षेत्र अधिकारी एस. एस. खान यांच्या मार्गदर्शनाखाली हे बचावकार्य यशस्वीपणे पार पडले.

Leave a Reply