आगरवायंगणी: दापोली येथील नॅशनल हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेजमध्ये २९ ऑक्टोबर रोजी दापोली तालुका माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाची महत्त्वपूर्ण सभा पार पडली.
या सभेत संघाच्या नूतन कार्यकारिणीची सर्वानुमते निवड करण्यात आली असून अध्यक्षपदी संतोष हजारे यांची वर्णी लागली आहे.
या सभेला मुख्याध्यापक राज्य महामंडळाचे कोषाध्यक्ष संदेश राऊत आणि जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष आयुब मुल्ला यांची प्रमुख उपस्थिती होती.
सभेच्या सुरुवातीला मागील सभेचे इतिवृत्त वाचून कायम करण्यात आले. त्यानंतर वर्गणी जमा करण्याबाबत सूचना देण्यात आल्या आणि मागील जमाखर्चास रीतसर मंजुरी देण्यात आली.

यासोबतच राज्य व जिल्हास्तरीय मुख्याध्यापक संघाच्या बैठकांमध्ये चर्चेला आलेल्या विविध विषयांची सविस्तर माहिती उपस्थितांना देण्यात आली.
सभेच्या उत्तरार्धात सर्वांच्या संमतीने आणि उत्साही वातावरणात नूतन कार्यकारिणीची निवड प्रक्रिया पार पडली.
या नूतन कार्यकारिणीमध्ये अध्यक्षपदी संतोष हजारे, तर उपाध्यक्षपदी प्रकाश सोनवलकर आणि अरुण सिदनाईक यांची निवड करण्यात आली.
तसेच सचिव पदाची जबाबदारी निलेश हिले यांच्यावर सोपवण्यात आली असून सहसचिव म्हणून फैयाज वलेले आणि प्रसिद्धी प्रमुख म्हणून सत्यवान दळवी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

विद्या समितीच्या सचिवपदी भक्ती सावंत, सहसचिवपदी शिल्पा काटकर, जी.आर. संकलन प्रमुख म्हणून अश्रफ आंजर्लेकर तसेच महिला प्रतिनिधी म्हणून नुजहत रखांगे आणि काजल राऊत यांची बहुमताने निवड करण्यात आली.
नवनिर्वाचित कार्यकारिणीला राज्य महामंडळ कोषाध्यक्ष संदेश राऊत आणि जिल्हाध्यक्ष आयुब मुल्ला यांनी पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. या सभेला मावळते सचिव सुनील देसाई यांच्यासह तालुक्यातील अनेक मुख्याध्यापक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

