रत्नागिरी : जिल्ह्यातील खेड तालुक्यातील हेदली येथील रिक्षा व्यावसायिक आणि सामाजिक कार्यकर्ते अहमद दाऊद बांगी यांना बी द चेंज फाउंडेशनच्या वतीने दिला जाणारा ‘महाराष्ट्र गुणगौरव पुरस्कार २०२६’ नुकताच प्रदान करण्यात आला.

सामाजिक कार्य क्षेत्रातील त्यांच्या उल्लेखनीय योगदानाची आणि सातत्यपूर्ण परिश्रमांची दखल घेऊन त्यांची या राज्यस्तरीय पुरस्कारासाठी निवड करण्यात आली होती. शिर्डी येथे रविवारी, २५ ऑक्टोबर रोजी या भव्य पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.

बी द चेंज फाउंडेशनचे अध्यक्ष मयुर ढोकचौळे यांच्या उपस्थितीत बांगी यांना सन्मानचिन्ह, शाल, प्रमाणपत्र, बॅच आणि पारंपरिक महाराष्ट्रीयन फेटा देऊन गौरविण्यात आले.

अहमद बांगी हे १९९५ पासून खेडमध्ये रिक्षा व्यवसाय करत असून त्यांनी या व्यवसायात प्रामाणिकपणाचा एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे.

प्रवाशांच्या रिक्षात विसरलेल्या मौल्यवान वस्तू सुरक्षितपणे परत करण्याच्या त्यांच्या वृत्तीचे नेहमीच कौतुक झाले आहे. रिक्षाचालकांच्या समस्या सोडवणे, त्यांच्यासाठी आरोग्य शिबिरे आयोजित करणे, परवाने व कागदपत्रे मिळवून देण्यासाठी मदत करणे यात त्यांचा नेहमीच पुढाकार राहिला आहे.

कोरोनाच्या संकटातही त्यांनी अन्नधान्य आणि जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करत शासकीय यंत्रणेला मोठे सहकार्य केले होते.

याआधी १९८९ ते १९९५ या काळात त्यांनी गृहरक्षक दलात सेवा बजावली असून ते हेदली ग्राम शिक्षण समितीचे उपाध्यक्ष म्हणूनही कार्यरत राहिले आहेत.

सांस्कृतिक क्षेत्रातही त्यांचे मोठे योगदान असून खेडमधील नवनिर्माण कला संस्थेच्या स्थापनेत त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

सध्या बांगी हे भारतीय जनता पार्टीच्या वाहतूक आणि ट्रान्सपोर्ट सेलचे जिल्हाध्यक्ष तसेच रिक्षा संघटनेचे जिल्हाध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या या सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय क्षेत्रातील बहुआयामी कार्याची दखल घेत फाउंडेशनने त्यांना हा बहुमान दिला आहे.

अहमद बांगी यांना हा पुरस्कार मिळाल्याबद्दल भारतीय जनता पार्टीचे नेते वैभव खेडेकर, वाहतूक ट्रान्सपोर्ट सेलचे कोकण विभाग अध्यक्ष संतोष नलावडे, वाहतूक सेलचे जिल्हाध्यक्ष मधुकर आंब्रे, रिक्षा सेलचे तालुकाध्यक्ष राजन खेडेकर आणि छत्रपती शिवाजी महाराज रिक्षा चालक व मालक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विशाल कापडी यांच्यासह खेड परिसरातील सर्व रिक्षाचालक आणि नागरिकांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.