महाड : मुंबई-गोवा महामार्गावरील नांगलवाडी फाट्याजवळ रविवारी सायंकाळी भरधाव कार आणि दुचाकी यांच्यात झालेल्या भीषण समोरासमोर धडक होऊन दापोलीचा रहिवासी प्रा. दानिश पालटे या ४० वर्षीय व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला. काही काळ डॉ. डी. वाय. पाटील हॉटेल मॅनेजमेंट महाविद्यालयात काही दिवस ते प्राध्यापक म्हणून कार्यरत होते.
मिळालेल्या माहितीनुसार, प्रा. दानिश पालटे हे दापोली येथून आपल्या दुचाकीवरून मुंबईच्या दिशेने प्रवास करत होते. महाड तालुक्यातील नांगलवाडी फाटा परिसरात आले असता, समोरून भरधाव येणाऱ्या स्कोडा कार आणि त्यांच्या दुचाकीमध्ये अत्यंत भीषण समोरासमोर धडक झाली.
ही धडक इतकी जोरदार होती की दुचाकीचा अक्षरशः चक्काचूर झाला असून कारचेही मोठे नुकसान झाले आहे. अपघातातील गंभीर दुखापतींमुळे प्रा. दानिश पालटे यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर स्थानिक ग्रामस्थ आणि प्रवाशांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले.
प्रा. दानिश पालटे दापोली आणि परिसरातील एक अतिशय हसतमुख आणि सर्वांशी मिळूनमिसळून राहणारा चेहरा होता.
आपल्या मनमिळाऊ स्वभावामुळे त्यांनी दापोली शहरासह ग्रामीण भागातही आपला मोठा मित्रपरिवार निर्माण केला होता.
विशेष म्हणजे, कोकणातील पर्यटनाला चालना मिळावी आणि येथील निसर्गसौंदर्य जगासमोर यावे, यासाठी त्यांच्या मनात मोठी तळमळ होती.
पर्यटनाच्या माध्यमातून दापोलीतील स्थानिक रोजगाराला आणि व्यवसायाला कशी गती देता येईल, यावर ते नेहमी सकारात्मक विचार करत असे. त्यांच्या याच धडपडणाऱ्या वृत्तीमुळे ते अनेकांच्या गळ्यातील ताईत बनले होते.
मूळचे दापोली तालुक्यातील आडे गावचे सुपुत्र असलेले दानिश सध्या काळकाई कोंड, हिल टॉप परिसरात वास्तव्याला होते.
रविवारच्या त्या एका दुर्दैवी क्षणाने त्यांच्या कुटुंबाचा आधार तर हिरावून घेतलाच, पण परिसरातील एका उमद्या व्यक्तीमत्वाचा अकाली अंत झाला.
त्याच्ंया अचानक जाण्याने दापोलीत मोठी शोककळा पसरली असून, त्यांचे मित्र आणि परिचित जुन्या आठवणींना उजाळा देत हळहळ व्यक्त करत आहेत.
दरम्यान, या अपघाताची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला असून मृतदेह शवविच्छेदनासाठी नजीकच्या ग्रामीण रुग्णालयात पाठवलं.
हा अपघात नेमका कशामुळे झाला, दोन्ही वाहनांपैकी कोणाचे नियंत्रण सुटले होते का? याबाबतची अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नसून पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहे.

