दापोली : विधानसभा मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मोठा राजकीय धक्का बसला आहे. पक्षाचे दापोली विधानसभा मतदारसंघ क्षेत्रप्रमुख मुजीब अलीमिया रुमाणे यांनी आपल्या पदाचा आणि पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे.
उत्तर रत्नागिरीचे जिल्हाप्रमुख विक्रांत जाधव यांच्याकडे २५ ऑक्टोबर रोजी त्यांनी आपला राजीनामा अधिकृतपणे सुपूर्द केला. वैयक्तिक अडचणींमुळे आपण स्वखुशीने राजीनामा देत असल्याचे रुमाणे यांनी पत्रात स्पष्ट केले आहे.
रुमाणे यांनी आपल्या राजीनामा पत्रात पक्षातील वरिष्ठ नेत्यांचे आणि सहकाऱ्यांचे आभार मानले आहेत. पक्षात काम करत असताना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे, आमदार भास्कर जाधव आणि जिल्हाप्रमुख विक्रांत जाधव यांच्यासह दापोली मतदारसंघातील तिन्ही तालुकाप्रमुख, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे मोलाचे सहकार्य व मार्गदर्शन लाभल्याचे त्यांनी नमूद केले आहे.
ऐन राजकीय घडामोडींच्या काळात क्षेत्रप्रमुखांनीच पक्षाला सोडचिठ्ठी दिल्याने दापोलीतील राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे.
मुजीब रुमाणे यांच्या या अचानक घेतलेल्या निर्णयामुळे दापोलीतील ठाकरे गटाला धक्का बसला आहे. आगामी काळात येथील राजकीय समीकरणांवर याचा काय परिणाम होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
मुजीब रूमाणे आता काय राजकीय निर्णय घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे.

