रत्नागिरी : पोलीस दलातील आव्हानात्मक सेवा, कौशल्याने हाताळलेली आंदोलने आणि गुन्हे तपासातील नैपुण्याची दखल घेत लांजा उपविभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेश कदम यांना उल्लेखनीय सेवेबद्दल राष्ट्रपती पोलीस पदक प्रदान करण्यात आले आहे.

मुंबई येथील मलबार हिलमधील राजभवनाच्या दरबार हॉलमध्ये आयोजित पदक अलंकरण समारंभात राज्यपाल विष्णू देव वर्मा यांच्या हस्ते कदम यांना या पदकाने सन्मानित करण्यात आले.

त्यांच्या या यशस्वी वाटचालीमागे वरिष्ठ अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन, प्रोत्साहन आणि त्यांनी दाखवलेला विश्वास अत्यंत महत्त्वाचा ठरला आहे.

सुरेश कदम यांची १९९५ मध्ये पोलीस उपनिरीक्षक म्हणून निवड झाल्यानंतर त्यांनी मुंबई, कोल्हापूर, गोंदिया, ठाणे, पालघर, पुणे व रत्नागिरीत उत्कृष्ट सेवा बजावली.

रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात कार्यरत असताना तत्कालीन उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेश भालेकर यांच्या शिफारशीवरून, फेब्रुवारी २००८ मध्ये तत्कालीन पोलीस अधीक्षक फत्तेसिंग पाटील आणि अपर पोलीस अधीक्षक सुरेश मेंगडे यांनी कदम यांच्यावर विश्वास दाखवून त्यांची जयगड पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकारीपदी नेमणूक केली होती.

या काळात जेएसडब्ल्यू प्रकल्प व आंग्रे पोर्टच्या उभारणीदरम्यान उद्भवलेली आंदोलने त्यांनी शांततेत हाताळली, तसेच जेएसडब्ल्यू कॉलनीतील बॉम्बस्फोटाचा यशस्वी तपास केला.

पुढे जैतापूर आंदोलनानंतर नाटे पोलीस ठाणे परिसरात निर्माण झालेला तणाव दूर करण्यासाठी तत्कालीन पोलीस अधीक्षक दीपक पांडे यांनी कदम यांच्या जयगडमधील अनुभवाचा विचार करून त्यांच्यावर नाटेची जबाबदारी सोपवली.

तिथेही त्यांनी उत्कृष्ट काम करत पोलिसांबद्दलचा जनतेचा विश्वास परत मिळवून दिला.

रत्नागिरी ग्रामीणचे पोलीस निरीक्षक असताना २०१८ चे गँगवॉर व उद्योजक दीपक गद्रे खंडणी प्रकरणाचा तपास त्यांनी धैर्याने केला.

गोंदियासारख्या नक्षलग्रस्त भागात बजावलेल्या सेवेबद्दल त्यांना यापूर्वी महासंचालक सन्मानचिन्ह व विशेष सेवा पदकानेही सन्मानित करण्यात आले होते.

ऑगस्ट २०२५ मध्ये पोलीस उपअधीक्षकपदी बढती मिळाल्यानंतर लांजा येथे कार्यरत असताना त्यांनी केतकर ज्वेलर्स अपहरण प्रकरण व आंबा घाटातील दरोडा उघडकीस आणला.

वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या प्रेरणेतून पार पाडलेल्या याच सातत्यपूर्ण आणि उत्कृष्ट कामगिरीची दखल घेऊन अखेर त्यांना राष्ट्रपती पोलीस पदक या बहुमानाने गौरविण्यात आले आहे.