रत्नागिरी : वाढत्या सायबर गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी आर्थिक व्यवहार करताना अधिक सतर्क राहावे, ऑनलाइन फसवणुकीच्या विविध प्रकारांपासून स्वतःचे संरक्षण करावे आणि बँक खात्यातील ठेवी सुरक्षित ठेवण्यासाठी आवश्यक खबरदारी घ्यावी, या उद्देशाने दापोली अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेनं जिल्हाभर सायबर सुरक्षा जनजागृतीचा उपक्रम राबविला आहे.

या उपक्रमांतर्गत त्यांनी जिल्ह्यातील महत्त्वाच्या लोकप्रतिनिधींसह वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांना जनजागृती पत्रके देऊन नागरिकांमध्ये सायबर सुरक्षेविषयी जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न केला.

वाढत्या डिजिटल व्यवहारांच्या काळात सर्वसामान्य नागरिकांची आर्थिक फसवणूक होऊ नये, तसेच ऑनलाइन व्यवहार करताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी, याची माहिती जनतेपर्यंत पोहोचविणे हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे.

संचालक निलेश जालगावकर यांनी या जनजागृती उपक्रमांतर्गत पालकमंत्री उदय सामंत, गृहराज्यमंत्री योगेश कदम, सिंधुदुर्ग रत्नागिरीचे खा. नारायण राणे  लांजा-राजापूरचे आमदार किरण ऊर्फ भैया सामंत, चिपळूणचे आमदार शेखर निकम, गुहागरचे आमदार भास्कर जाधव आणि जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांच्यासह जिल्ह्यातील महत्त्वाच्या व्यक्तींना सायबर फसवणुकीपासून बचाव करण्याबाबतची माहितीपत्रके दिली.

याशिवाय जिल्ह्यातील प्रांताधिकारी आणि तहसीलदार यांच्यापर्यंतही ही माहिती पोहोचविण्यात आली. लोकप्रतिनिधी, पोलीस यंत्रणा आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या माध्यमातून सायबर सुरक्षेचा संदेश अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहोचावा, या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वाचा ठरत आहे.

दापोली अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेच्या वतीने तयार करण्यात आलेल्या या जनजागृती पत्रकात डेबिट आणि क्रेडिट कार्ड सुरक्षित ठेवण्यापासून ते एटीएम, यूपीआय, गुगल पे, आयएमपीएस, मोबाइल बँकिंग आणि नेट बँकिंगचा वापर करताना घ्यावयाच्या खबरदारीपर्यंत विविध मुद्द्यांची माहिती देण्यात आली आहे.

नागरिकांनी आपला एटीएम पिन, यूपीआय पिन, मोबाइल अॅपचा पासवर्ड आणि नेट बँकिंगची गोपनीय माहिती कोणाशीही शेअर करू नये. कार्ड हरवल्यास संबंधित बँकेशी तातडीने संपर्क साधावा आणि अनधिकृत आर्थिक व्यवहार झाल्याचे लक्षात आल्यास त्वरित तक्रार नोंदवावी, असे आवाहन दापोली अर्बन बँकेचे चेअरमन जयवंत जालगावकर यांनी केलं  आहे.

सोशल मीडिया, ईमेल आणि बँक खात्यांसाठी एकच पासवर्ड वापरणे टाळावे, तसेच वैयक्तिक माहिती, बँक खाते क्रमांक, जन्मतारीख, मोबाइल क्रमांक आणि लाइव्ह लोकेशन सार्वजनिकपणे शेअर करताना सावधगिरी बाळगावी, यावरही भर देण्यात आला आहे.

ऑनलाइन फसवणूक करणारे अनेकदा आकर्षक बक्षिसे, लॉटरी, घरबसल्या धार्मिक स्थळांचे दर्शन किंवा मोठी रक्कम मिळण्याचे आमिष दाखवून नागरिकांना जाळ्यात ओढतात.

अशा वेळी अनोळखी व्यक्तीने पाठविलेल्या लिंकवर क्लिक करणे, संशयास्पद अॅप डाउनलोड करणे किंवा पैसे मिळविण्यासाठी स्वतःच्या खात्यातून आधी पैसे पाठविणे टाळावे, असा संदेश या पत्रकातून देण्यात आला आहे.

बँकेचा अधिकारी असल्याचे भासवून फोन करणाऱ्या व्यक्तींना गोपनीय माहिती देऊ नये. तसेच पोलीस कारवाई, मुलगा किंवा मुलगी ताब्यात असल्याचे सांगून अथवा डिजिटल अरेस्टची भीती दाखवून पैशांची मागणी करणाऱ्या व्यक्तींपासून सावध राहावे, असेही नागरिकांना सूचित करण्यात आले आहे.

सायबर गुन्हेगारांकडून वापरल्या जाणाऱ्या नव्या पद्धतींबाबत नागरिकांना माहिती असणे आवश्यक आहे. त्यामुळे केवळ बँकेचे ग्राहकच नव्हे, तर ऑनलाइन आर्थिक व्यवहार करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने सतर्क राहणे गरजेचे आहे.

अनोळखी फोन, संदेश, ईमेल किंवा लिंकवर विश्वास ठेवण्यापूर्वी त्यांची सत्यता पडताळून पाहावी आणि संशयास्पद व्यवहार झाल्यास तातडीने योग्य यंत्रणेकडे तक्रार करावी, असे आवाहन या जनजागृती मोहिमेतून करण्यात आले आहे. भारतातील सायबर आर्थिक फसवणुकीच्या तक्रारींसाठी १९३० हा हेल्पलाइन क्रमांक आणि राष्ट्रीय सायबर गुन्हे तक्रार पोर्टलचा वापर करता येतो.

बँकिंग व्यवहार अधिक सुरक्षित व्हावेत आणि नागरिकांनी आपल्या कष्टाच्या पैशांचे संरक्षण करावे, यासाठी निलेश जालगावकर यांनी पुढाकार घेत जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, पोलीस अधिकारी आणि प्रशासकीय यंत्रणेपर्यंत सायबर सुरक्षा जनजागृती पत्रके पोहोचविली.

बँकिंग क्षेत्रातील सामाजिक जबाबदारीची जाणीव ठेवून राबविण्यात आलेला हा उपक्रम नागरिकांमध्ये डिजिटल आर्थिक साक्षरता वाढविण्यासाठी उपयुक्त ठरू शकतो. सायबर फसवणूक टाळण्यासाठी केवळ तक्रार यंत्रणा सक्षम असणे पुरेसे नसून प्रत्येक नागरिकाने जागरूक राहणे आवश्यक आहे, हा संदेश या उपक्रमातून देण्यात आला आहे.