दापोली : विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी तसेच त्यांच्यातील सर्जनशीलता, अभिव्यक्ती कौशल्य आणि आत्मविश्वास वाढीस लागावा, या हेतूने ५ ते ७ ऑक्टोबर २०२६ दरम्यान रांगोळी, चित्रकला व वक्तृत्व स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.

‘सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत आयोजित ही तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा ७ ऑक्टोबर रोजी दापोली येथील आर. आर. वैद्य इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये पार पडली.

या स्पर्धेत जिल्हा परिषद शाळा साखळोली क्र. १ च्या विद्यार्थिनींनी उल्लेखनीय कामगिरी करत तालुका पातळीवर शाळेचा नावलौकिक वाढवला आहे.

लहान गटात आद्या विनोद गोरीवले हिने ‘माझी शाळा सुंदर शाळा’ या विषयावर प्रभावी विचार मांडत तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावला. मोठ्या गटात शुभ्रा पंकज घडवले हिने ‘माझ्या स्वप्नातील भारत’ या विषयावर आत्मविश्वासपूर्ण व ओजस्वी भाषण करून प्रथम क्रमांक मिळविला.

एकाच शाळेतील दोन विद्यार्थिनींनी वेगवेगळ्या गटांत तालुका पातळीवर प्रथम क्रमांक मिळवल्याने साखळोली शाळेचे सर्वत्र कौतुक होत आहे.

या विद्यार्थिनींना समीर ठसाळ, संदेश चव्हाण आणि संगिता लोहारे यांचे मार्गदर्शन लाभले. या यशाबद्दल मुख्याध्यापक, शिक्षकवृंद, शाळा व्यवस्थापन समिती, पालक आणि ग्रामस्थांनी दोघींचे अभिनंदन केले आहे.