दापोली: लायन्स क्लब दापोलीच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपत टाळसुरे येथील राज एकनाथ लाले या विद्यार्थ्याला शैक्षणिक दत्तक सहाय्य प्रदान करण्यात आले आहे.
या विशेष उपक्रमाचे आयोजन लायन्स क्लब दापोलीचे अध्यक्ष गुरुप्रसाद बेर्डे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी क्लबचे माजी अध्यक्ष अतुल मेहता यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
या प्रसंगी आयोजित कार्यक्रमाला क्लबचे आशिष मेहता, खजिनदार फजल रखांगे, सुजय मेहता, मनोहर जैन, श्रीराम माजलेकर आणि प्रसाद मेहता हे सदस्य उपस्थित होते.
यावेळी उपस्थित सदस्यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की, शिक्षण हेच समाजपरिवर्तनाचे सर्वात प्रभावी साधन आहे. त्यामुळे गरजू आणि होतकरू विद्यार्थ्यांच्या शिक्षणात खंड पडू नये यासाठी लायन्स क्लब दापोली भविष्यातही सातत्याने अशा विविध समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन करत राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी क्लबच्या सर्व सदस्यांनी सक्रिय सहभाग नोंदवून विशेष मेहनत घेतली.

