संगमेश्वर: रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यात देवरूख आणि साखरपा पोलिसांनी धडक कारवाई करत विनापरवाना गुरांची वाहतूक करणारी तीन वाहने पकडली आहेत. या कारवाईत दोन म्हैशी आणि सहा बैल अशा एकूण आठ गुरांची सुटका करण्यात आली असून, वाहन चालकांसह त्यांच्या सहकाऱ्यांवर देवरूख पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ही कारवाई सोमवारी सायंकाळी आणि रात्रीच्या सुमारास करण्यात आली.
देवरूख पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री सव्वा एक वाजण्याच्या सुमारास देवरूख सह्याद्रीनगर भागात पोलीस गस्त घालत होते. यावेळी पोलिसांना संशयास्पद रित्या जाणारी एक बोलेरो पिकअप गाडी आढळून आली. पोलिसांनी या गाडीची थांबवून तपासणी केली असता, गाडीच्या हौद्यात चार बैल अत्यंत दाटीवाटीने बांधलेल्या अवस्थेत मिळून आले.
चालकाकडे गुरांच्या वाहतुकीचा कोणताही वैध परवाना नसल्याने पोलिसांनी गाडी जप्त करत चार बैलांची सुटका केली. याप्रकरणी अवैधरित्या गुरांची वाहतूक केल्याबद्दल नितीन गंगाराम चव्हाण (रा. खेड, जि. रत्नागिरी) आणि रोहन अंकुश साळुंखे (रा. कराड, जि. सातारा) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दुसऱ्या कारवाईत पोलिसांनी सोमवारी सायंकाळी साडेचार आणि पावणेपाच वाजण्याच्या सुमारास साखरपा तळवाडी येथे विनापरवाना गुरांची वाहतूक करणारी दोन वाहने पकडली. यामध्ये पहिल्या गाडीत दोन म्हैशी आढळून आल्या. याप्रकरणी विनापरवाना म्हैशींची वाहतूक केल्याप्रकरणी संतोष गजबार (रा. तेये, ता. संगमेश्वर, जि. रत्नागिरी) आणि संतोष जांगळी (रा. येगाव, ता. चिपळूण, जि. रत्नागिरी) यांच्याविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
तर पावणेपाच वाजता झालेल्या कारवाईत विनापरवाना दोन बैलांची वाहतूक करणारी दुसरी गाडी पकडण्यात आली. या कारवाईत गणेश लांबोरो (रा. धुंदरे, ता. लांजा, जि. रत्नागिरी) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या तिन्ही कारवाईतील वाहन चालकांकडे जनावरांच्या वाहतुकीसाठी आवश्यक असलेला कोणताही परवाना किंवा कागदपत्रे नसल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. त्यानुसार पोलिसांनी वाहन चालक आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर रितसर गुन्हे नोंदवले असून देवरूख पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

