राजापूर : तालुक्यातील बारसू-सोलगाव येथे प्रस्तावित असलेल्या अणुऊर्जा प्रकल्पाला स्थानिक नागरिकांचा तीव्र विरोध असल्याने राजापूर पंचायत समितीच्या मासिक सभेत या प्रकल्पाविरोधात एकमुखी ठराव मंजूर करण्यात आला.

जनभावनांचा आदर करून हा प्रकल्प पुढे नेऊ नये, अशी ठाम भूमिका सदस्यांनी या वेळी मांडली. राजापूर पंचायत समितीच्या किसान भवन येथे सभापती नंदिनी कदम यांच्या अध्यक्षतेखाली ही मासिक सभा पार पडली.

या सभेला उपसभापती अभिजीत गुरव, गटविकास अधिकारी रोहित कुंभार, सहाय्यक गटविकास अधिकारी संतोष म्हेत्रे, शिवसेनेचे गटनेते उमेश पराडकर, प्रतोद प्रसाद मोहरकर यांच्यासह पंचायत समिती सदस्य आणि विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. या सभेत रस्ते, वीज, कृषी आणि शिक्षण विभागाच्या कामकाजावरही सदस्यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत प्रशासनाला धारेवर धरले.

आढावा घेताना काही विभागांचे अधिकारी अथवा त्यांचे प्रतिनिधी अनुपस्थित राहिल्याने सदस्यांनी संताप व्यक्त केला. विशेषतः सार्वजनिक बांधकाम विभाग, महावितरण आणि कृषी विभागाच्या कामकाजातील त्रुटी, विकासकामांमधील दिरंगाई आणि प्रशासकीय कार्यपद्धतीवर कठोर शब्दांत टीका करण्यात आली.

तालुक्यातील रस्त्यांच्या दुरवस्थेचा मुद्दाही या सभेत लक्षवेधी ठरला. ओणी-अणूस्कुरा मार्गावरील मोठमोठ्या खड्ड्यांमुळे वाहनचालकांना मोठा त्रास होत असल्याचे सदस्य उमेश पराडकर आणि अपेक्षा मासये यांनी निदर्शनास आणून दिले आणि या मार्गाची तातडीने दुरुस्ती करून वाहतूक सुरक्षित करण्याची मागणी केली.

शिक्षण विभागाच्या आढाव्यावेळी तालुक्यातील केंद्रप्रमुखांची रिक्त पदे भरल्याची माहिती गटशिक्षणाधिकाऱ्यांनी दिली. कृषी विभागाच्या कामकाजाबाबत मात्र सदस्यांनी तीव्र असमाधान व्यक्त केले. तालुका कृषी कार्यालय शहरापासून दूर असल्याने शेतकऱ्यांची गैरसोय होत असून, हे कार्यालय पंचायत समितीच्या आवारात स्थलांतरित करण्याचा ठराव सभेत मंजूर करण्यात आला.

कृषी सहाय्यक आणि कृषी सेवक शेतकऱ्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचत नसल्याची तक्रार करत कृषी विभागाशी संबंधित प्रश्नांवर स्वतंत्र बैठक आयोजित करण्याची मागणी सदस्य अपेक्षा मासये यांनी केली.

विकासकामांतील त्रुटी आणि जनतेच्या प्रश्नांवर सदस्यांनी आक्रमक भूमिका घेतल्याने ही सभा चांगलीच गाजली. सभेच्या शेवटी शिवसेनेचे प्रतोद प्रसाद मोहरकर यांनी काही अभिनंदनाचे ठराव मांडले.