रायगड : जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे पाताळगंगा नदीला आलेल्या पुरात खारपाडा परिसरातून तब्बल तीन हजार गॅस सिलिंडर वाहून गेल्याची धक्कादायक घटना बुधवारी घडली.

नदीच्या आणि खाडीच्या पाण्यात मोठ्या प्रमाणावर वाहून आलेले हे गॅस सिलिंडर परिसरातील काही नागरिकांनी चक्क बोटीच्या साह्याने बाहेर काढून स्वतःकडे नेल्याचे निदर्शनास आले आहे.

या गंभीर प्रकाराची तातडीने दखल घेत रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. पुराच्या पाण्यातून मिळालेले गॅस सिलिंडर अशा प्रकारे स्वतःकडे ठेवणे अत्यंत धोकादायक ठरू शकते.

त्यामुळे ज्या नागरिकांनी हे गॅस सिलिंडर बाहेर काढून स्वतःच्या ताब्यात ठेवले आहेत, त्यांनी ते प्रशासनाकडे तात्काळ जमा करावेत, अशा स्पष्ट सूचना जिल्हाधिकारी जावळे यांनी दिल्या आहेत.

प्रशासनाच्या सूचनेकडे दुर्लक्ष करून गॅस सिलिंडर बेकायदेशीरपणे स्वतःकडे ठेवल्यास सुरक्षिततेच्या कारणास्तव संबंधित नागरिकांवर कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.

संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी आणि नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने प्रशासनाने हे पाऊल उचलले असून, सर्वांनी याकामी प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.