रत्नागिरी : हवामान बदल आणि कीडरोगांच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे कोकणातील नारळ आणि सुपारी बागायती मोठ्या संकटात सापडल्या आहेत.
या पार्श्वभूमीवर केंद्र शासनाने प्रधानमंत्री पीकविमा योजनेअंतर्गत नारळ व सुपारी पिकांचा समावेश करून यंदापासून विमा संरक्षण लागू केले आहे.
त्यामुळे उत्पादनातील घट आणि आर्थिक नुकसानीला सामोरे जाणार्या रत्नागिरी जिल्ह्यातील बागायतदारांना मोठा आधार मिळणार आहे.
जगभरामध्ये कोकणाला विशेष ओळख मिळवून देणार्या हापूस आंब्यासह काजूपीक गेल्या दशकभरामध्ये सातत्याने वातावरणामध्ये झालेल्या बदलांमुळे अडचणीत आले आहे.
कीडरोगांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लाखो रुपयांचा खर्च करूनही उत्पादनातील घट थांबत नाही. अशा स्थितीत हवामान बदलाचा कमी परिणाम होणार्या आणि वर्षाकाठी दोनवेळा हमखास उत्पन्न मिळवून देणार्या सुपारी बागायतीकडे कोकणातील शेतकरी वळत आहेत, मात्र सध्या सुपारी आणि नारळ उत्पादनातही निम्म्यापेक्षा जास्त घट झाली आहे.
शासनाच्या प्रधानमंत्री पीकविमा योजनेंतर्गत पीकविमा संरक्षणासाठी रत्नागिरी जिल्ह्यातील नारळ पिकासाठी ५२, तर सुपारी पिकासाठी २३ अशी मिळून ७४ मंडलांची निवड झाली आहे.
कमी तापमान, वेगाचा वारा, जास्त पाऊस, आर्द्रता आणि गारपीट यामुळे नुकसान झाल्यास नारळ पिकाकरिता एक लाख सत्तर हजार आणि गारपिटीकरिता स्वतंत्र सत्तावन हजार, तर सुपारी पिकाकरिता एक लाख आणि गारपिटीकरिता स्वतंत्र तेहतीस हजार रुपयांचे संरक्षण कवच मिळाले आहे.
या योजनेअंतर्गत नारळ पिकासाठी चक्रीवादळासदृश परिस्थिती व अतिशय कमी तापमान, तर सुपारी पिकासाठी फळगळतीस कारणीभूत ठरणारा वेगवान वारा आणि अवकाळी पाऊस या घटकांपासून संरक्षण देण्यात आले आहे.
सातत्याने येणारी अतिवृष्टी, वाढते तापमान, बुरशी, माकडांचा त्रास आणि फळगळती यामुळे शेतकरी त्रस्त होते. पंचायत समिती सदस्य राजेश गुरव आणि शेतकरी संतोष पाटील यांनी सांगितले की, गेल्या काही वर्षांमध्ये कीडरोगांचा प्रादुर्भाव वाढल्याने व्यवस्थापनावर होणारा वाढता खर्च आणि त्या तुलनेत मिळणारे कमी उत्पन्न ही बागायतदारांची व्यथा होती.
आंबा आणि काजू पिकाप्रमाणे सुपारी व नारळ पिकालाही पीकविम्याचे संरक्षण मिळाल्याने आता शेतकऱ्यांना एकप्रकारे मोठा आर्थिक आधार मिळाला आहे.

