रत्नागिरी: सध्या सोशल मीडिया आणि इतर माध्यमांवर भूमी अभिलेख विभागामध्ये भरती प्रक्रिया सुरू असल्याच्या बोगस जाहिराती मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहेत. मात्र, ही भरती प्रक्रिया पूर्णपणे खोटी असून नागरिकांनी अशा कोणत्याही फसव्या जाहिरातींना बळी पडू नये, असे आवाहन रत्नागिरीचे भूमी अभिलेख जिल्हा अधीक्षक सचिन इंगळी यांनी केले आहे.

भूमी अभिलेख विभागात नोकरीच्या सुवर्णसंधी असल्याचा दावा करणारे मेसेज सध्या सगळीकडे फिरत असल्याच्या पार्श्वभूमीवर, नागरिकांची फसवणूक टाळण्यासाठी सचिन इंगळी यांनी एका व्हिडिओ संदेशाद्वारे या संदर्भात स्पष्टीकरण दिले आहे. जर या जाहिरातींच्या अनुषंगाने कोणाला नियुक्ती पत्रे मिळाली असतील, तर त्यांनी थेट भूमी अभिलेख कार्यालयात येऊन त्याची सत्यता तपासून घ्यावी, असे त्यांनी सांगितले.

नोकरीचे आमिष दाखवून नागरिकांची फसवणूक करणाऱ्या टोळ्यांवर कडक कारवाई होणे गरजेचे आहे. त्यामुळे अशा बोगस जाहिराती पसरवून किंवा नियुक्ती पत्रांच्या नावाखाली आर्थिक फसवणूक करणाऱ्या लोकांविरुद्ध नागरिकांनी त्वरित संबंधित पोलीस ठाण्यात रितसर गुन्हा दाखल करावा.

तसेच, कोणत्याही भूलथापांना बळी न पडता केवळ अधिकृत माहितीसाठी शासकीय संकेतस्थळांचा किंवा कार्यालयाचा वापर करावा, असेही सचिन इंगळी यांनी स्पष्ट केले आहे.