रत्नागिरी : तालुक्यातील तात्यासाहेब मुळये माध्यमिक विद्यालय, जाकादेवी येथे इयत्ता आठवीत शिक्षण घेणाऱ्या तरवळ येथील सर्वेश संदेश मायंगडे या विद्यार्थ्याने अत्यंत धाडस आणि प्रसंगावधान दाखवत एका अट्टल चोराला पकडून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.
सर्वेशची कौटुंबिक परिस्थिती अत्यंत हलाखीची असून तीन वर्षांपूर्वी त्याच्या वडिलांना लखवा आला आहे. त्याची आई मजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवते. आर्थिक अडचणींमुळे त्याला शाळेचा नवा गणवेश घेणेही शक्य नव्हते.
मात्र, ज्यांच्या घरात चोरी झाली होती, त्या कुटुंबाने सर्वेशच्या धाडसाबद्दल कृतज्ञता व्यक्त करत त्याला शाळेचा नवीन गणवेश भेट दिला. एप्रिल महिन्यात गावात चादरी विकण्याच्या बहाण्याने आलेल्या एका व्यक्तीने परिसराची पाहणी केली आणि दुसऱ्या दिवशी तरवळ मायंगडेवाडी येथील एका घरात चोरीचा डाव आखला.
चोरी सुरू असल्याचे सर्वेशच्या निदर्शनास येताच त्याने क्षणाचाही विलंब न लावता आपल्या मोबाईलवर संशयिताचे चित्रीकरण केले आणि तत्काळ घरमालकाला याची माहिती दिली. त्यानंतर घरमालकासह सर्वेशने मोटारसायकलवरून आरोपीचा पाठलाग सुरू केला.
निवळी परिसरात आरोपीला गाठल्यानंतर सर्वेशने त्याच्याशी संवाद साधत प्रसंगावधान राखले. आरोपी हातखंबा येथे जात असल्याचे समजताच सर्वेश थेट त्याच्याच मोटारसायकलवर बसला. काही अंतर पुढे गेल्यावर आरोपीने सर्वेशला गाडीवरून खाली ढकलले आणि पळून जाण्याचा प्रयत्न केला.
तरीही सर्वेशने धैर्य न गमावता हातखंबा येथील ग्रामस्थांच्या मदतीने पोलिसांना पाचारण केले व मोबाईलमधील चित्रीकरणासह सर्व महत्त्वाचे पुरावे पोलिसांच्या स्वाधीन केले. या तपासात आरोपीने दोन घरांतून सुमारे ४३ हजार रुपयांची रोकड चोरल्याचे उघडकीस आले.
रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी आरोपीला गजाआड केले. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल पोलीस निरीक्षक राजेंद्र यादव यांच्या हस्ते सर्वेश मायंगडे याला प्रशस्तीपत्र आणि ५ हजार रुपयांचे रोख पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले.
तसेच, शिक्षण संस्थेचे चेअरमन सुनील मयेकर, मुख्याध्यापक नितीन मोरे आणि सर्व शिक्षकांनीही त्याचे विशेष कौतुक केले असून, विद्यार्थी दशेत दाखविलेल्या या अतुलनीय शौर्याबद्दल सर्वेशवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

