दापोली : तालुक्यातील हर्णे येथे घडलेल्या मारहाण प्रकरणातील आरोपींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केली आहे.

या संदर्भात मनसेच्या वतीने दापोली पोलिस ठाण्यात निवेदन देण्यात आले. हर्णे परिसरातील किल्ला येथे काही तरुण दारू आणि नशेच्या पदार्थांचे सेवन करत असताना दोन शिवप्रेमींनी त्यांना समज देण्याचा प्रयत्न केला होता.

मात्र, दुसऱ्या दिवशी काही व्यक्तींनी जमाव गोळा करून त्या दोन्ही शिवप्रेमींना बेदम मारहाण केली.

या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण असून कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याचे मनसेने म्हटले आहे.

या गंभीर प्रकरणाची सखोल चौकशी करून सर्व आरोपींवर त्वरित कायदेशीर कारवाई करण्यात यावी. तसेच किल्ला किंवा इतर कोणत्याही धार्मिक स्थळी गैरप्रकार करणाऱ्यांवर कारवाई करावी आणि भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

परिसरात कोणताही धार्मिक वाद निर्माण होणार नाही याची प्रशासनाने दक्षता घ्यावी. पीडितांना न्याय मिळवून देण्यासाठी आणि परिसरात शांतता अबाधित ठेवण्यासाठी पोलिस प्रशासनाने तातडीने लक्ष घालावे, अशी मागणी मनसे दापोली तालुका अध्यक्ष नितिन साठे यांनी पोलिसांकडे केली आहे.