दापोली : तालुक्यातील हर्णे येथील ऐतिहासिक गोवा किल्ला परिसरात दोन तरुणांवर झालेल्या सामूहिक हल्ल्यामुळे बुधवारी, २७ मे रोजी रात्री परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
याप्रकरणी पोलिसांनी सहा जणांना ताब्यात घेतले असून, त्यांना न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
या मारहाणीत चिन्मय सुधीर गुरव (वय २३) आणि महेंद्र रघुवीर हे दोन तरुण गंभीर जखमी झाले असून पुढील उपचारांसाठी त्यांना डेरवण येथे हलविण्यात आले आहे.
मंगळवारी, २६ मे रोजी रात्री गोवा किल्ला परिसरात काही तरुण सिगारेट ओढत आणि गोंधळ घालत असल्याची माहिती किल्ल्याचे बांधकाम ठेकेदार नरेश मोहिते यांनी चिन्मय गुरवला दिली होती.
मर्दानी खेळाचे प्रशिक्षक असलेला चिन्मय आपला मित्र महेंद्र रघुवीर याच्यासह तिथे गेला आणि त्यांनी त्या तरुणांना समज दिली.
त्यावेळी संबंधित तरुणांनी शिवीगाळ करून पळ काढला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी मशिदीजवळ संबंधितांनी माफी मागितल्याने वाद मिटल्याचे समजले जात होते.
या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. मात्र, कालचा व्हिडिओ व्हॉट्सअॅपवर का टाकला, असा जाब विचारत बुधवारी सायंकाळी पुन्हा वाद उफाळून आला.
चिन्मय गुरव याने दिलेल्या तक्रारीनुसार, झैन असलम हुनेरकर आणि मुफीज जावेद सोलकर यांनी इतर १० ते १५ जणांसह गोवा किल्ल्याच्या बुरुजावर जाऊन चिन्मय आणि महेंद्र यांना लोखंडी सळ्या आणि लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली.
या हल्ल्यात चिन्मयच्या गळ्यातील तीन तोळ्यांची सोनसाखळी गहाळ झाल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिक आणि युवकांनी हर्णे पोलीस दूरक्षेत्र आणि दापोलीतील केळसकर नाका येथे मोठी गर्दी केली.
आरोपींना तात्काळ अटक करण्याच्या मागणीसाठी हर्णे-दापोली बायपास मार्गावर टायर जाळून रास्ता रोको करण्यात आला. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून पोलीस निरीक्षक महेश तोरसकर यांनी तातडीने कुमक घेऊन घटनास्थळी धाव घेतली.
जमाव आक्रमक असल्याने रात्री उशिरा जलद कृती दल, दंगल नियंत्रण पथक आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पथक दाखल झाले.
उपविभागीय पोलीस अधिकारी शैलेश सणस यांनी जमावाला शांत करून परिस्थिती नियंत्रणात आणली.
त्यानंतर पोलीस अधीक्षक नितीन बगाटे आणि अपर पोलीस अधीक्षक बी. पी. महामुनी यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. त्यांनी नागरिकांशी संवाद साधून अफवांवर विश्वास न ठेवता शांतता राखण्याचे आवाहन केले.
याप्रकरणी पोलिसांनी झैन हुनेरकर (२२), मुफीज सोलकर (२३), सलाह कोंडविलकर (१९), नाबील काझी (१९), जैब जमादार (२०) आणि एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे.
या सर्वांना न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
सध्या परिसरात शांतता असून खबरदारीचा उपाय म्हणून अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

