रत्नागिरी: बाळासाहेब सावंत कोंकण कृषी विद्यापीठांतर्गत झाडगाव, रत्नागिरी येथील सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्रात गुरुवारी, २८ मे रोजी विनायक दामोदर सावरकर यांची १४३ वी जयंती साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला सावरकरांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी संशोधन केंद्रातील सर्व अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्राचे वरिष्ठ वैज्ञानिक अधिकारी आणि विभाग प्रमुख केतनकुमार चौधरी यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना सावरकरांच्या देशकार्यावर आणि विशेषतः त्यांच्या रत्नागिरीतील वास्तव्या दरम्यानच्या कार्यावर प्रकाश टाकला.
सावरकरांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी अथांग कष्ट उपसले असून रत्नागिरीत असताना त्यांनी केलेले समाजसुधारणेचे कार्य थक्क करणारे आहे.
अस्पृश्यता निवारण, पतितपावन मंदिराची स्थापना आणि भाषाशुद्धी यांसारख्या चळवळींतून त्यांनी समाजाला नवी दिशा दिली. त्यांचे विचार आजही तरुणांसाठी मार्गदर्शक आहेत, असे केतन चौधरी यांनी नमूद केले.
कार्यक्रमाचा समारोप राष्ट्रप्रेमाने भारलेल्या वातावरणात झाला असून या उपक्रमाबद्दल संशोधन केंद्रातील उपस्थितांनी समाधान व्यक्त केले.

