
दापोली| प्रतिनिधी :
दापोली हे एक प्रमुख पर्यटन केंद्र असल्याने या ठिकाणी पर्यटकांची नेहमीच मोठी वर्दळ असते. मात्र सध्या दापोली शहर आणि समुद्र किनारपट्टीवरील हॉटेल तसेच स्वीट मार्ट व्यावसायिकांना व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या तीव्र तुटवड्याचा सामना करावा लागत आहे.
या समस्येमुळे हैराण झालेल्या व्यावसायिकांनी अखेर दापोली तहसीलदारांची भेट घेऊन त्यांना आपल्या मागण्यांचे निवेदन सादर केले.
१२ मार्च २०२६ रोजी देण्यात आलेल्या या निवेदनात व्यावसायिकांनी नमूद केले आहे की, सध्याच्या जागतिक युद्धजन्य परिस्थितीचा परिणाम गॅस पुरवठ्यावर होत असून कंपन्यांकडून पुरेसा साठा उपलब्ध होत नाही.
यामुळे स्थानिक गॅस वितरण एजन्सीकडून व्यावसायिक सिलेंडर मिळणे कठीण झाले आहे.
जर गॅसचा पुरवठा सुरळीत झाला नाही, तर हॉटेल आणि खानावळी चालवणे अशक्य होईल, ज्याचा थेट परिणाम व्यावसायिकांच्या आर्थिक स्थितीवर आणि तिथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या रोजगारावर होऊ शकतो अशी भीती यावेळी व्यक्त करण्यात आली.
या गंभीर परिस्थितीची दखल घेत दापोली शहर आणि परिसरातील व्यावसायिकांनी तहसीलदारांकडे मागणी केली की, गॅस वितरण एजन्सींना व्यावसायिक सिलेंडरचा पुरेसा पुरवठा करण्याबाबत तातडीने लेखी व तोंडी आदेश देण्यात यावेत.
यावेळी दापोलीतील अनेक प्रमुख व्यावसायिक उपस्थित होते. या निवेदनावर सकारात्मक प्रतिसाद देत तहसीलदार यांनी स्पष्ट केले की, ही समस्या देशपातळीवर असली तरी दापोली हे पर्यटन क्षेत्र असल्याने या प्रश्नाकडे प्राधान्याने लक्ष दिले जाईल.
तसेच हे निवेदन पुढील कार्यवाहीसाठी वरिष्ठांकडे पाठवून हॉटेल व्यावसायिकांचा प्रश्न लवकरात लवकर सोडवण्याचे आश्वासन त्यांनी दिले.

Leave a Reply