
दापोली हे कोकणातील एक महत्त्वाचे पर्यटन स्थळ असल्याने शहरात पर्यटकांची मोठी वर्दळ असते. मात्र, मुख्य रस्त्यांवर झालेल्या अतिक्रमणामुळे वाहतुकीला आणि पादचाऱ्यांना मोठा अडथळा निर्माण होत आहे.
या पार्श्वभूमीवर दापोली नगरपंचायतीने शहरात धडक अतिक्रमण विरोधी मोहीम हाती घेतली असून अनधिकृत बांधकामांवर कारवाई सुरू केली आहे.
मुख्याधिकारी महादेव रोडगे यांनी या मोहिमेची सविस्तर माहिती दिली आहे.
रोडगे यांनी स्पष्ट केले की, शहरातील प्रमुख राज्य महामार्ग आणि अंतर्गत रस्त्यांवर फूटपाथ तसेच गटारांवर मोठ्या प्रमाणात कच्ची व पक्की अतिक्रमणे झाली आहेत.
नगरपरिषदेने यापूर्वी अनेकदा कारवाई केली होती, तरीही काही ठिकाणी कायमस्वरूपी बांधकामे पुन्हा उभी राहिली आहेत. त्यामुळे आता टप्प्याटप्प्याने ही अतिक्रमणे पूर्णपणे काढून टाकण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.
मोहिमेच्या पहिल्या टप्प्यात बस स्टँड ते बुरोंडी नाका आणि केळसकर नाका परिसरातील अतिक्रमणे हटवण्यात आली आहेत.
पुढील टप्प्यात दाभोळ रोड आणि क्रीडा संकुलाकडे जाणाऱ्या रस्त्यांवरील अडथळे दूर केले जाणार आहेत.
केवळ रस्त्यावरील अतिक्रमणेच नव्हे, तर खासगी जागेत झालेल्या बेकायदेशीर वाढीव बांधकामांवरही एमआरटीपी कायद्यानुसार रीतसर कारवाई केली जाईल, असा इशारा महादेव रोडगे यांनी दिला आहे.
सध्या रस्ते आणि फूटपाथ मोकळे करणे हा प्राथमिक उद्देश असून, त्यानंतर प्राप्त होणाऱ्या तक्रारींनुसार पुढील कारवाई केली जाईल.
शहराचा विकास आणि पर्यटकांची सोय लक्षात घेता, नागरिक आणि व्यापाऱ्यांनी स्वतःहून अतिक्रमणे काढावीत आणि नो-पार्किंगमध्ये वाहने उभी करू नयेत, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
दरम्यान, केवळ आमच्यावर केवळ आमच्यावर अन्याय न करता सर्वांवर समान कारवाई करण्याची मागणी कारवाई झालेल्या खोकेधारकांनी आणि रस्त्यावर बसून व्यवसाय करणाऱ्यांनी नगरपंचायतीकडे केली आहे.

Leave a Reply