
रत्नागिरी : कोकणची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रत्नागिरीत एक ऐतिहासिक आध्यात्मिक सोहळा सज्ज होत आहे.
जागतिक शांततेचे दूत आणि आर्ट ऑफ लिव्हिंगचे संस्थापक श्री श्री रविशंकर यांचे २२ जानेवारी २०२६ रोजी शहरात आगमन होत आहे.
या निमित्ताने गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या विस्तीर्ण मैदानावर सायंकाळी ६ वाजता भव्य ‘भक्ती उत्सव’ (भक्ती महासत्संग) आयोजित करण्यात आला आहे.
रोजच्या धकाधकीच्या जीवनात वाढणाऱ्या तणावामुळे मनुष्य सुखी आणि समाधानी राहणे कठीण होत चालले आहे.
अशा परिस्थितीत मनापासून हसणे आणि आनंदी राहणे किती महत्त्वाचे आहे, हे जगाला सांगणारे सुदर्शन क्रिया तंत्राचे प्रणेते आध्यात्मिक गुरू श्री श्री रविशंकर यांच्या मार्गदर्शनाचा अनुभव कोकणवासीयांना मिळणार आहे.
आर्ट ऑफ लिव्हिंगच्या कोर्सेसमध्ये श्वासाच्या तंत्रावर आधारित प्रभावी पद्धती शिकवल्या जातात, ज्यामुळे मन संतुलित, शांत आणि एकाग्र होते.
वर्तमान क्षणात राहून उत्तम काम करण्याची क्षमता वाढते. सुदर्शन क्रिया आणि सहज ध्यान यांसारख्या तंत्रांमुळे विचार सकारात्मक होतात आणि जीवनात सकारात्मक बदल घडतो.
आध्यात्मिक गुरू श्री श्री रवी शंकर यांनी गेल्या अनेक दशकांत योग, ध्यान आणि प्राणायामाचा प्रचार करून जगभरातील कोट्यवधी लोकांना तणावमुक्त आणि निर्भय बनवले आहे.
त्यांच्या सुदर्शन क्रियेमुळे १८० हून अधिक देशांतील लोकांच्या जीवनात आनंद परतला आहे. जागतिक शांततेच्या दूत म्हणून त्यांनी युद्धग्रस्त भागांतही महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. राममंदिरासारख्या संवेदनशील मुद्द्यांवरही त्यांनी सकारात्मक पुढाकार घेतला आहे.
हा भक्ती उत्सव केवळ व्याख्यान नसून, ज्ञान, ध्यान आणि भजन-सत्संगाचा अनोखा संगम असेल. प्रत्यक्ष गुरुदेवांच्या उपस्थितीत सामूहिक ध्यान, भजन आणि मार्गदर्शनाची संधी रत्नागिरीकरांना मिळेल, ज्यामुळे प्रत्येकाच्या जीवनात नवी ऊर्जा येईल.
रत्नागिरी ही निसर्गसंपन्न आणि सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध भूमी असल्याने गुरुदेवांच्या आगमनामुळे येथील आध्यात्मिक महत्त्व अधिक वाढणार आहे.
आर्ट ऑफ लिव्हिंगच्या टीमकडून या सोहळ्याचे यशस्वी नियोजन करण्यासाठी अहोरात्र मेहनत सुरू आहे.
या कार्यक्रमाला रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांबरोबरच कोल्हापूर, पुणे, मुंबई, सांगली, सातारा आदी ठिकाणांहून १५,००० ते २०,००० नागरिक उपस्थित राहण्याची अपेक्षा आहे.


Leave a Reply