डॉ. नंदकुमार तावडे यांचे दुःखद निधन

दापोली : डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे माजी विस्तार शिक्षण विभाग प्रमुख डॉ. नंदकुमार तावडे यांचे काल १६ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी ६.३० वाजता गिम्हवणे येथील त्यांच्या निवासस्थानी निधन झाले. ते ७८ वर्षांचे होते.

त्यांच्या पश्चात पत्नी, मुले, बंधू, वहिनी आणि नातवंडे असा मोठा परिवार आहे.

डॉ. तावडे यांनी १९६६ मध्ये दापोलीच्या कृषी महाविद्यालयात प्रवेश घेतला आणि बी.एस्सी. (कृषी) पदवी प्राप्त केली. नंतर पुण्याच्या कृषी महाविद्यालयातून कृषी विस्तार विषयात एम.एस्सी. पूर्ण केली. काही काळ राज्य शासनाच्या सांख्यिकी विभागात सेवा दिल्यानंतर दापोली कृषी   सहाय्यक प्राध्यापक म्हणून नियुक्ती झाली.

सेवेत असताना त्यांना पीएच.डी. शिक्षणासाठी नवी दिल्लीतील भारतीय कृषी अनुसंधान संस्थेत प्रतिनियुक्तीवर पाठवण्यात आले. जागतिक कीर्तीचे कृषी विस्तार तज्ञ डॉ. वाय. पी. सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी संशोधन करून पीएच.डी. पदवी संपादन केली.

डॉ. तावडे यांनी सहाय्यक प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, प्राध्यापक आणि विभाग प्रमुख या पदांवर काम करताना कृषी विस्तार क्षेत्रात वेगळी कार्यशैली निर्माण केली. अध्यापन, संशोधन आणि तंत्रज्ञान प्रसार या तिन्ही क्षेत्रांत त्यांनी उल्लेखनीय योगदान दिले.

महाविद्यालयाच्या सहशैक्षणिक उपक्रमांतही त्यांचे मोठे योगदान होते. राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) आणि राष्ट्रीय छात्र सेना (एनसीसी) पथकांचे नेतृत्व त्यांनी केले.

ते अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संस्था आणि शास्त्रीय नियतकालिकांचे सदस्य व पदाधिकारी होते. देशातील विविध कृषी विद्यापीठांतील पदव्युत्तर आणि पीएच.डी. प्रबंधांचे मूल्यमापन त्यांनी केले. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षांसाठी प्रश्नपत्रिका तयार करणे आणि उत्तरपत्रिका तपासण्याचे कामही त्यांना दिले जायचे.

अनेक विद्यार्थ्यांना पदव्युत्तर स्तरावर मार्गदर्शन केले आणि शास्त्रीय व कृषी विषयक नियतकालिके, वृत्तपत्रांमध्ये लेख प्रकाशित केले.

कृषी महाविद्यालय आणि कोकण कृषी विद्यापीठाच्या विद्यार्थी परिषद, अभ्यास मंडळ, विद्याशाखा, विद्या परिषद आणि कार्यकारी परिषदेत सदस्य व पदाधिकारी म्हणूनही त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.

डॉ. तावडे यांच्या निधनामुळे राज्य आणि देशातील कृषी व विस्तार शिक्षण क्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे. कोकण कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. श्रीरंग कद्रेकर, डॉ. अरविंद सावंत, डॉ. विजय मेहता, डॉ. संजय सावंत, मराठवाडा कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. अशोक ढवण, नाबार्डचे माजी प्राध्यापक डॉ. नाथ शेटे, महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे माजी विस्तार शिक्षण संचालक डॉ. गजानन सावंत, अकोला कृषी विद्यापीठाचे माजी विस्तार शिक्षण संचालक डॉ. पी. ओ. इंगळे, भारतीय कृषी अनुसंधान परिषदेचे माजी सहायक महासंचालक डॉ. नारायण जांभळे यांसह अनेक मान्यवरांनी शोकसंवेदना व्यक्त केल्या आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*