नवीन पाणीपुरवठा योजनांकरिता दापोली, मंडणगडसाठी ८० कोटींचा निधीची तरतुद करणार- ना. उदय सामंत

दापोली:- दापोली व मंडणगड या दोन्ही शहरांसाठी नवीन पाणीपुरवठा योजना राबविण्यासाठी दापोलीकरिता ५० कोटी, तर मंडणगडसाठी ३० कोटी रुपयांची आवश्यकता असून नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करून लवकरात लवकर दोन्ही नगर पंचायतीना राज्य नगरोत्थान निधीमधून निधी उपलब्ध करू दिला जाईल, अशी माहिती राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

नाट्यगृहाचा आराखडा तयार करा

दापोली शहरात नाट्यगृहासाठी विकास आराखड्यात जागा मंजूर असून तेथे नाट्यगृह न करता बहुद्देशीय सभागृह जसे वेंगुर्ला (जि. सिंधुदुर्ग) येथे केले आहे तसे करावा, यासाठी एक आराखडाही तयार करावा असा पर्याय आपण येथील नगरपंचायत प्रशासनाला सुचविला आहे.

दापोलीत म्हाडाची घरे उभारणार

दापोली येथे असलेल्या म्हाडाच्या जागेत १६० घरे उभारण्यात येणार असून त्यातील १०० घरे ही अत्यल्प उत्पन्न गटासाठी, तर ६० घरे अल्प उत्पन्न गटासाठी असतील. त्यासाठी १८ कोटी रुपये मंजूर झाले.असून त्या घरांचा दर लवकरच म्हाडा जाहीर करेल. आपण म्हाडाचे अध्यक्ष असताना या ठिकाणी भेट दिली होती व आराखडे तयार करण्याचे आदेशही तेव्हा दिले होते, असे ते म्हणाले.

दापोली शहरात उभारलेल्या अश्वारूढ पुतळ्याच्या अनावरणाकरीता ना. आदित्य ठाकरे यांना बोलवणार

दापोली शहरात उभारलेल्या अश्वारूढ पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमाला आम्ही राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य
ठाकरे यांना बोलावणार आहोत. दापोली व मंडणगड येथील मतदारांनी शिवसेना व राष्ट्रवादी आघाडीवर विश्वास ठेवून आघाडीला सत्तेत आणली आहे. त्यांनी जो आमच्यावर विश्वास टाकलेला आहे त्याला आम्ही तडा जाऊ देणार नाही, असे ना. सामंत म्हणाले. या वेळी माजी आ. सूर्यकांत दळवी, विधानसभा क्षेत्राध्यक्ष किशोर देसाई, तालुकाप्रमुख ऋषि गुजर, नगराध्यक्षा ममता मोरे व इतर नगरसेवक उपस्थित होते.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*