राज्यातील करोना संसर्गाची दुसरी लाट ओसरताना दिसत असली, तरी देखील अद्यापही नवीन करोनाबाधित आढळून येत आहेत. शिवाय करोनाबाधितांच्या मृत्यू संख्येतही भर पडतच आहे. तर, दिलासादायक बाब म्हणजे मागील काही दिवसांपासून सातत्याने दररोज आढळणाऱ्या करोनाबाधितांच्या तुलनेत करोनामुक्त होणाऱ्यांची संख्या अधिक आढळून येत आहेत. तर, राज्यातील रूग्ण बरे होण्याचे प्रमाणही वाढताना दिसत आहे. मागील २४ तासात राज्यभरात ८ हजार ६२३ रूग्ण करोनामुक्त झाले असून, ८ हजार ८५ नवीन करोनाबाधित आढळले आहेत. तर, २३१ करोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. आज करोनाबाधित व करोनामुक्त झालेल्यांच्या संख्येतील फरक हा काहीसा कमी झाल्याचे दिसून आले.

दरम्यान, राज्यात आजपर्यंत एकूण ५८,०९,५४८ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट ) ९६ टक्के एवढे झाले आहे. तर, सध्या राज्यातील मृत्यूदर २.०१ टक्के एवढा आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ४,१३,९८,५०१ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६०,५१,६३३ (१४.६२ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ६,२१,३७७ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ३,५८४ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज रोजी एकूण १,१७,०९८ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. तर, करोना पाठोपाठ आता डेल्टा प्लस या नवीन आजाराने देखील डोकं वर काढलं आहे. या संदर्भात सर्वसामान्यांमध्ये अनेक संभ्रम निर्माण झाले असून, चिंतेचे वातावरण देखील दिसत आहे. या संदर्भात आज राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी माध्यमांशी बोलताना माहिती दिली. या क्षणाला डेल्टा प्लसच्या संदर्भात अधिक चिंता करण्याची आवश्यकता नाही. आपण सध्या करोना नियमांचे पालन करून वागावं, एवढीच माझी सूचना राहील. असं टोपे म्हणाले आहेत.