दापोली : सायकलिंगला प्रोत्साहन देण्यासाठी आणि सायकल संस्कृती वाढवण्याच्या उद्देशाने दापोली सायकलिंग क्लबतर्फे आयोजित दापोली समर सायक्लोथॉन २०२५, सिझन ७ ही सायकल स्पर्धा ११ आणि १२ मे २०२५ रोजी उत्साहात संपन्न झाली. या स्पर्धेत ७ ते ७८ वयोगटातील ३०० स्पर्धकांनी सहभाग घेतला, यामध्ये ७८ वर्षीय सायकलपटू डॉ. निरुपमा भावे यांनी सर्वांचे लक्ष वेधले.
दापोली-आसूद-सालदुरे-पाळंदे-आंजर्ले-अडखळ-पाजपंढरी-हर्णै-दापोली या ५० किमीच्या समुद्रकिनारी मार्गावर कोकणातील निसर्गसौंदर्याचा आनंद घेत सर्वांनी सायकलिंगचा आनंद लुटला. पर्यटनस्थळांना भेटी देत कोकणी खाद्यपदार्थ, मासे, आंबे, फणस, काजू आणि रानमेव्याचा आस्वाद घेण्यात आला.

ही सायक्लोथॉन ५० किमी कोस्टल सिनिक रुट, १५० किमी शॉर्ट सिटी लूप आणि फॅन राईड अशा गटांमध्ये आयोजित झाली. सर्व स्पर्धकांना मेडल आणि प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले. पुण्यातील ७८ वर्षीय डॉ. निरुपमा भावे यांनी वयाच्या ७० व्या वर्षी पुणे ते कन्याकुमारी सायकल राईड करत वाढदिवस साजरा केला होता.

त्यांनी वयाच्या ७२ व्या वर्षी पुणे ते जम्मू, ७५ व्या वर्षी पुणे ते कोलकाता आणि पंढरपूर ते घुमान (पंजाब) असे सायकल प्रवास केले आहेत. याशिवाय, श्रीनगर ते मुंबई ते कन्याकुमारी सायकलिंगद्वारे जागतिक विक्रम नोंदवणारे सतीश जाधव (वय ६८), उमलिंगला पास सर करणारे डॉ. सुभाष कोकणे (वय ७३), जयश्री जाधव (वय ६२), राजू औटी (वय ६१), विजय हिंगे (वय ६५), हेमलता राव (वय ६६) आणि युट्युबर माधुरी पाचपांडे यांनी सहभाग घेतला.

पुण्याहून डॉ. सुभाष कोकणे (वय ७३), विजय हिंगे (वय ६५), विद्याधर पालकर, मुंबई-ठाण्याहून अक्षय खांडेकर, नारायण पेरुमल, नयन पांचाळ, तौसिफ शेख, रवी यादव, महेंद्र निकम, विठोबा चव्हाण हे सायकल चालवत दापोलीत पोहोचले. शॉर्ट सिटी लूपवर अथर्व शेंडे, संतोष परब, स्वराज मांजरे यांनी १५०+ किमी, अनुज शिगवण, अथर्व मांडवकर, प्रेम भुसारे, सार्थक शिगवण यांनी १२५+ किमी, तर परेश बुटाला, स्वराज राजपूरकर, आयुष शिंदे, मयूर देसाई यांनी ८०+ किमी सायकलिंग केली.

दापोली शिक्षण संस्था, दापोली होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज, दापोली तालुका आरोग्य अधिकारी, दापोली पोलीस, मेनेकी अब्सुलूट एनर्जी ड्रिंक, राहुल मंडलिक, हॉटेल ओम साई यांचे सहकार्य लाभले. अंबरीश गुरव, प्रशांत पालवणकर, राजेशकुमार कदम, रागिणी रिसबूड, राजेंद्र नाचरे, सुनील रिसबूड, विनय गोलांबडे, नितीन बर्वे यांनी नियोजनात मोलाची भूमिका बजावली.