रायगड : पोलादपूर-महाबळेश्वर मार्गावर असलेल्या धोकादायक आंबेनळी घाटात शनिवारी (आज) दुपारी 1.45 च्या सुमारास नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी येथून सहलीसाठी आलेल्या एसटी बसला (MH 40 AQ 6225) अपघात होता होता टळला. बसमधून प्रवास करणारे 60 विद्यार्थी सुखरूप आहेत.

प्रतापगडहून महाबळेश्वरकडे निघालेल्या या बसचं वाडा कुंभारोशी गावाजवळ तीव्र वळणावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस रस्त्याच्या कडेला असलेल्या खोल दरीत घसरली.

सुदैवाने, बसची चाके मातीच्या ढिगाऱ्यात अडकल्याने मोठा अनर्थ टळला.

अपघात होताच, बसमधील सर्व 60 विद्यार्थ्यांनी तत्परता दाखवत आपत्कालीन दरवाजातून सुरक्षितपणे बाहेर उड्या मारल्या. त्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही.

चालकाने सतर्कता दाखवत काही वेळातच बसला रस्त्यावर आणले. त्यानंतर बस विद्यार्थ्यांसह महाबळेश्वरच्या दिशेने रवाना झाली.

या अपघातामुळे घाटातील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती.

आंबेनळी घाट हा अरुंद रस्ते आणि धोकादायक वळणांसाठी ओळखला जातो. यापूर्वीही या घाटात अनेक जीवघेणी अपघाते झाली आहेत. त्यामुळे वाहनचालकांनी अधिक सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे.