महाड शहरामधील पाच मजली इमारत कोसळली, एकाचा मृत्यू

रायगड – महाड तालुक्यातील साळीवाडा नाका येथील हापूस तलावाजवळील पाच मजली इमारत कोसळल्यानं 30 पेक्षा जास्त नागरिक जखमी झाले आहेत तर एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अनेक जण अडकल्याची भीती वर्तवली जात आहे.

महाड शहरातील काजळपुरा परिसरात निवासी इमारत पत्त्यासारखी कोसळली आहे.  ही दुर्घटना आज संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास घडली आहे. घटनास्थळी नागरिकांची गर्दी झाली असून बचावकार्य सुरु झाले आहे. इमारतीचा ढिगारा हटवण्याचे काम सुरु आहे. महाड, श्रीवर्धन आणि माणगाव विभागाचे पोलीस बचावकार्यासाठी पोहोचले आहेत. एनडीआरएफची टीम देखील घटनास्थळी मदतकार्य करत आहे.

मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी महाडमध्ये कोसळलेल्या इमारतीबाबत आमदार भरत गोगावले व जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्यासोबत चर्चा केली. जखमींवर योग्य उपचार करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत. त्याचबरोबर मदतकार्य वेगवान करण्याच्या सुचनाही दिल्या आहेत.

तारीक गार्डन नावाच्या या इमारतीला १० वर्ष देखील पूर्ण झालेले नाहीयेत. ही इमारत पडण्यापूर्वी काही वेळ थरथरत होती अशी माहिती स्थानिकांनी दिली. त्यामुळे काही जण जीव वाचवण्यासाठी तातडीनं इमारती बाहेर पडले. काही लोकं मात्र या इमारतीमधून बाहेर पडू शकले नाहीत. या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली ७० लोकं अडकल्याची भिती व्यक्त होत आहे.

पालकमंत्री अदिती तटकरे या घटनेकडे लक्ष देत आहेत. जिल्हाधिकारी आणि पोलीस प्रमुखांना दुर्घटनाग्रस्तांना मदत करण्याचे आदेश दिले आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*