दापोलीः दापोली नगरपंचायतीमध्ये मोठी राजकीय उलथापालथ होण्याची शक्यता आहे. सत्ताधारी आघाडीतील ७ नगरसेवकांपैकी ५ नगरसेवक उद्या, सोमवारी स्वतंत्र गट स्थापन करण्याच्या तयारीत आहेत, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.

या घडामोडीमुळे नगरपंचायतीतील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता वर्तवली जात आहे.नगरसेवकांमध्ये उपनगराध्यक्ष खालीद अब्दुल्ला रखांगे, महबूब कमरुद्दीन तळघरकर, संतोष दत्ताराम कलकुटके, अन्वर अ. गफुर रखांगे, विलास राजाराम शिगवण, अश्विनी अमोल लांजेकर आणि रिया रूपेश सावंत यांचा समावेश आहे.

नगरसेवक अन्वर अ. गफुर रखांगे, महबूब कमरुद्दीन तळघरकर, संतोष दत्ताराम कलकुटके, विलास राजाराम शिगवण, अश्विनी अमोल लांजेकर यांच्या नावाची चर्चा आहे.

दोन वर्षांपूर्वी झालेल्या निवडणुकीत शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने युती करून १४ नगरसेवक निवडून आणले होते.

त्यावेळी शिवसेनेचे ६ तर राष्ट्रवादीचे ८ नगरसेवक होते. शिवसेनेच्या ममता मोरे नगराध्यक्ष झाल्या होत्या.

या निवडणुकीत तत्कालीन आमदार योगेश कदम यांना बाजूला ठेवून ही युती झाली होती.

त्यानंतर राज्यातील राजकीय परिस्थितीत मोठे बदल झाले. शिवसेनेत फूट पडली आणि उद्धव ठाकरे गट व एकनाथ शिंदे गट असे दोन गट निर्माण झाले.

दापोलीतील शिवसेनेचे नगरसेवक उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहिले. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या ७ नगरसेवकांनी उपनगराध्यक्ष खालिद रखांगे यांच्या नेतृत्वाखाली स्वतंत्र गट स्थापन करत, आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला.

आता पुन्हा एकदा, नगरपंचायतीमध्ये राजकीय घडामोडी घडत आहेत. सत्ताधारी गटातील ५ नगरसेवक उद्या स्वतंत्र गट स्थापन करण्याच्या तयारीत आहेत.

या निर्णयामुळे नगरपंचायतीतील राजकीय गणिते बदलण्याची शक्यता आहे.

या नगरसेवकांच्या भूमिकेमुळे आगामी काळात दापोली नगरपंचायतीच्या राजकारणात काय बदल होतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. या संदर्भात अधिकृत माहिती लवकरच समोर येईल.