रत्नागिरी : जिल्ह्यातील उबाठा शिवसेनेचे तीन माजी आमदार लवकरच शिवसेना शिंदे गटामध्ये प्रवेश करणार असल्याचे निश्चित झाले असल्याची जोरदार चर्चा सुरु आहे.
त्यातच आता उबाठा शिवसेनेच्या जिल्ह्यातील संगमेश्वर विधानसभा मतदारसंघातील माजी आमदार सुभाष बने आणि राजापूर विधानसभाचे माजी आमदार गणपत कदम यांनी उद्योग मंत्री उदय सामंत यांच्यासह ठाणे इथा उपमुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेतती आहे.
राजापूरचे पराभूत उमेदवार व उबाठा शिवसेनेचे नेते राजन साळवी हे भाजपामध्ये न जाता प्रमुख कार्यकर्ते यांच्या आग्रही भूमिकेमुळे लवकरच शिंदे यांच्या शिवसेनेतच प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
गणपत कदम व सुभाष बने यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्याने पक्ष प्रवेशाला दुजोरा मिळाला असल्याची चर्चा सुरु आहे.
तसेच लांजा राजापूरचे माजी आमदार राजन साळवी ही ऑपरेशन टायगर अंतर्गत लवकरच शिंदे गटात सहभागी होणार आहेत.
भाजपचे खासदार नारायण राणे यांचे कट्टर समर्थक असलेले सुभाष बने आणि गणपत कदम यांनी नारायण राणेंबरोबर काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता.
मात्र कालांतराने काँग्रेसमधून नारायण राणे यांची साथ सोडून माजी आमदार सुभाष बने आणि गणपत कदम यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यामुळे माजी उद्योगमंत्री नारायण राणे यांना मोठा राजकीय धक्का बसला होता.
निवडणुकीत सुभाष बनेंचा संगमेश्वर विधानसभा मतदारसंघ 2009मधे फेररचनेत विभागला गेला, तर गणपत कदम पराभूत झाले.
त्यानंतर काँग्रेसमधे नाराज झालेल्या सुभाष बने आणि गणपत कदम यांना शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्वगृही प्रवेश दिला होता.
गेली काही वर्षे शिवसेनेत असलेले माजी आम. सुभाष बने यांनी विधानसभा निवडणुकीत आपला पुत्र व माजी जिप अध्यक्ष रोहन बने याला उमेदवारी मिळावी म्हणून मागणी लावून धरली होती.
त्याला पक्ष प्रमुख व माजी खासदार विनायक राऊत यांनी शब्द देवून ही प्रतिसाद न दिल्याने आता ठाकरेंची साथ सोडून ते एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.
हा पक्ष प्रवेश लवकरच होणार असल्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सुतोवाच केले होते.त्यास शिंदे यांच्या भेटीनंतर शिक्कामोर्तब झालेची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
शिवसेना पक्षाच्या फुटीनंतर शिवसेनेचे कार्यकर्ते विभागले गेले आहेत. अनेक कार्यकर्त्यांनी व पदाधिकाऱ्यांनी शिवसेना शिंदे गटात आणि भाजपमध्ये प्रवेश केला आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात ऑपरेशन टायगर यशस्वी होण्यासाठी शिंदेंच्या शिवसेनेकडून ठाकरे गटाला वारंवार धक्के देण्यात येत आहेत.
नुकतेच ठाकरे गटाचे रत्नागिरी तालुकाप्रमुख बंड्या साळवी यांनी शिंदे गटात प्रवेश केला.
रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर विधानसभा मतदारसंघ सोडल्यास अन्य मतदार संघातील अनेक पदाधिकारी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून शिंन्दे गटात प्रवेश करू लागल्याने ठाकरे गटाचे बुरुज ढासळू लागले आहेत.