युक्रेनमधल्या २१९ भारतीय विद्यार्थ्यांना घेऊन एअर इंडियाचं विमान मुंबईत दाखल झालं आहे. केंद्रीय मंत्री पियूष गोयल यांनी मुंबई विमानतळावर विद्यार्थ्यांचं स्वागत केलं आहे. तसेच पियूष गोयल यांच्यानंतर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी देखील विद्यार्थ्यांचं स्वागत केलं आहे.
जेव्हापासून या युद्धाला सुरूवात झाली. तेव्हापासून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी खूप चिंतेत होते. यावेळी परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर हे वेळोवेळी आमच्यासोबत संपर्क करायचे. तसेच रशिया, युक्रेनसह आजूबाजूच्या सर्व देशांसह ते सतत संवाद साधत होते. त्यामुळे युक्रेनमध्ये अडकलेले २१९ विद्यार्थी सुखरूपपणे मुंबईत दाखल झाले आहेत. पीएम मोदींनी मला विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी येथे पाठवलं आहे, असं केंद्रीय मंत्री पियूष गोयल यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना म्हटले आहे.
युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना सुखरुप मायदेशी आणण्यासाठी एअर इंडियाचे विमान युक्रेनमध्ये दाखल झाले होते. परंतु एअर इंडियाचे AIC1944 हे पहिले विमान २१९ भारतीयांना घेऊन बुखापरेस्ट इथल्या हेन्री कोआंडा आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन निघाले आणि आता हे विमान मुंबईत छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर दाखल झाले आहे.
महापौर किशोरी पेडणेकर यांच्याकडून विद्यार्थ्यांचं स्वागत
युक्रेन मधून मुंबईत परतलेल्या २१९ विद्यार्थ्यांचे मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर गुलाब पुष्प देऊन स्वागत केले. याप्रसंगी उपमहापौर ॲड. सुहास वाडकर हेदेखील उपस्थित होते. हे सर्व विद्यार्थी युक्रेन मधील बुकोविनियन राज्य वैद्यकीय महाविद्यालयात शिक्षण घेत आहेत. या सर्व विद्यार्थ्यांसाठी खाद्यपदार्थ, पाणी, निवास इत्यादी व्यवस्था महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आली आहे.