रत्नागिरी:- राज्य शासनाने राज्यातील हजारो पोलीस कर्मचाऱ्यासाठी एक महत्वाचा क्रांतिकारी निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या प्रस्तावास मान्यता दिली असून यामुळे जिल्ह्यातील 18 पोलीस कर्मचाऱ्यांना पदोन्नती मिळाली आहे.
जिल्ह्यात पोलीस शिपाई, पोलीस नाईक, पोलीस हवालदार यांना पदोन्नतीचे आदेश पोलीस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग यांनी काढले आहे. या निर्णयामुळे पोलीस शिपाई संवर्गातील अंमलदारास कमी कालावधीत पदोन्नतीच्या 3 संधी कमी मिळून अधिकारी पदावरून सेवानिवृत्त होता येईल.
पोलीस महासंचालक संजय पांडे यांच्या पातळीवर गृहमंत्री दिलीप वळसेपाटील यांच्या मार्गदर्शनाने या संदर्भातील प्रस्तावावर गेल्या सहा महिन्यांपासून काम सुरू होते.
मुख्य सचिव सीताराम कुंटे यांच्या अध्यक्षतेखालील उच्चाधिकार समितीने यावर शिक्कामोर्तब केल्यानंतर मुख्यमंत्री ना. उद्धव ठाकरे यांनी यासंदर्भात तातडीने कार्यवाही करण्यात यावी व शासन निर्णयही निर्गमित करण्यात यावा अशा सूचना देऊन हा प्रस्ताव मंजूर केला.
या प्रस्तावाचा उद्देश हा पोलीस शिपाई पदावरील व्यक्तीस पोलीस उपनिरीक्षक पदापर्यंत पोहोचवणे आणि पर्यायाने पोलिसांचे मनोधैर्य व आत्मबल वाढून त्यांच्या कार्यक्षमतेत वाढ होणे असा आहे. या निर्णयामुळे प्रत्येक पोलीस स्थानकाकरता मोठ्या संख्येने गुन्हे कामकाजाच्या तपासासाठी अंमलदार मिळणार असून गुन्ह्यांच्या तपासात तसेच दोष सिद्धीच्या कामांत लक्षणीय वेग येणार आहे.
या निर्णयामुळे आता पोलीस शिपायांना त्यांच्या सरासरी 35 वर्षाच्या सेवा कालावधीमध्ये, पोलीस उपनिरीक्षक या अधिकारी पदावरुन सेवानिवृत्त होता येईल. पोलीस शिपायांना सर्वसाधारण 12 ते 15 वर्षानंतर पदोन्नती मिळत असल्यामुळे त्यांचे मनोबल कमी होऊन त्यांच्या कार्यक्षमतेवर विपरीत परिणाम दिसून येतो.
पोलीस अंमलदारांना पदोन्नती साखळीमध्ये पोलीस शिपाई, पोलीस नाईक, पोलीस हवालदार, सहायक पोलीस उपनिरीक्षक अशा तीन पदोन्नतीच्या संधी मिळतात. सर्वसाधारणपणे एका पदावर 10 वर्षे सेवाकालावधीनंतर पदोन्नती मिळायला पाहिजे पण वरच्या श्रेणीतील पदसंख्या कमी असल्यामुळे अपेक्षेपेक्षा दीर्घ कालावधी लागतो.
सेवा पूर्ण होण्याआधीच काही जण सेवानिवृत्त होतात, सध्या सहाय्यक पोलीस उप निरीक्षक या पदावर 3 वर्ष किंवा काही अंमलदार हे पोलीस हवालदार पदावरूनच सेवानिवृत्त होतात. अशा अंमलदारांना पोलीस उपनिरीक्षक पदावर पदोन्नतीची संधी मिळत नाही. त्यांना या निर्णयाचा मोठा लाभ होणार आहे. जिल्ह्यातील अठरा पोलीस कर्मचाऱ्यांना राज्य शासनाच्या नव्या आदेशाचा फायदा झाला आहे. पोलीस मुख्यालयात कार्यरत असलेले राजेंद्र यशवंत जाधव यांची पोलीस हवालदार ते सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अशी बढती मिळाली आहे. पोलीस नाईक पदावर कार्यरत असलेल्या मोटार विभागातील राजेश नाईक, ग्रामीण पोलिस स्थानकाच्या संजीवनी मोरे, चिपळूणचे संदेश गुजर यांना पोलीस हवालदार पदी बढती मिळाली आहे.
पोलीस शिपाई पदावर कार्यरत असलेल्या शहर पोलिसांच्या लुकमान तडवी, राजेश धनावडे, निखिल माने, दाभोळचे संजय धोपट, दापोलीच्या मयुरा खांबे, फोर्स वनचे मनोज शिंदे, देवरुखच्या ज्योती धामणस्कर, स्थानिक गुन्हे शाखेचे दत्तात्रय कांबळे, मंडणगडचे प्रशांत कांबळे, राजाराम गायकवाड मुख्यालयाच्या रेखा राऊत, अलोरेचे चंद्रकांत नाईक, पूर्णगडचे शेखर नुलके, जिल्हा वाहतूक शाखेचे प्रसाद कुलकर्णी यांना पोलीस नाईकपदी पदोन्नती देण्यात आले आहे. पोलीस अधीक्षक डॉ. मोहित कुमार गर्ग यांनी याबाबतचे आदेश काढले आहेत.