काही महिन्यांपूर्वी कमी होऊ लागलेलं करोनाचं प्रमाण देशात पुन्हा एकदा वाढू लागलं आहे. आणि यंदा वाढताना हे प्रमाण भीषण होऊ लागलं आहे. करोनाच्या पहिल्या लाटेमध्ये देखील जितके रुग्ण आढळले नव्हते आणि जितक्या रुग्णांचा मृत्यू झाला नव्हता, ते करोनाचे आकडे आता दिसू लागले आहेत. गेल्या २४ तासांमध्ये देशात तब्बल १ हजार ३४१ रुग्णांचा कोविड-१९ मुळे मृत्यू झाला आहे. गेल्या ४ दिवसांपासून रोज देशभरात १ हजारहून जास्त रुग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद होत आहे. त्यामुळे विविध राज्यांसोबतच केंद्रीय प्रशासन देखील चिंतेत आलं असून त्यापाठोपाठ नवीन करोनाबाधित आढळण्याचं प्रमाण देखील रोज नवनवे विक्रम करत आहे. गेल्या २४ तासांची आकडेवारी पाहाता देशभरात एकूण २ लाख ३४ हजार ६९२ नवे करोनाबाधित रुग्ण सापडले आहेत. दुसरीकडे १ लाख २३ हजार ३५४ रुग्ण बरे होऊन घरी गेल्यामुळे ही देशवासीयांसाठी दिलासादायक बाब ठरली आहे.