दापोली: शिवसेनेचा नगराध्यक्ष दापोली नगरपंचायतीमध्ये विराजमान व्हावा यासाठी सर्व शिवसैनिकांनी संघर्ष केला होता.

शिवसैनिकांवर जो अन्याय झाला होता त्याला वाचा फोडण्याचे काम शिवसैनिकांनी केले होते.

मंगळवार दिनांक 18 फेब्रुवारी 2025 रोजी पाच नगरसेवकांचा शिवसेनेमध्ये जाहीर पक्षप्रवेश हा शिवसेनेचा नगराध्यक्ष दापोलीत विराजमान होण्यासाठी उचललेले पहिले पाऊल आहे.

आपण सर्वांनी दापोली शहराच्या विकासाकरिता हातात हात घालून काम करूया, असे मत राज्याचे गृहराज्यमंत्री ना. योगेश कदम यांनी दापोलीत व्यक्त केले.

दापोली शहर शाखेच्या वतीने ना. योगेश कदम यांचा वाढदिवस व पाच नगरसेवकांचा पक्षप्रवेश सोहळा दापोली शहर शाखेच्या आवारात आयोजित करण्यात आला होता.

यावेळी आपले मत व्यक्त करताना ना. योगेश कदम म्हणाले की, विकासाची अपेक्षा वगळता अन्य कोणत्याही अपेक्षा न ठेवता या पाच नगरसेवकांनी शिवसेनेसोबत येण्याचा निर्णय घेतला आहे.

शिवसेनेत प्रवेश करताना त्यांनी नगरपंचायतीचा जो विकास गेल्या तीन वर्षात खुंटला आहे, तो पूर्ववत व्हायला पाहिजे.

शहरविकासासाठी विकास निधी मिळाला पाहिजे अशी अपेक्षा ठेवून त्यांनी आज पक्षप्रवेश केला असून या सर्वांना सर्व शिवसैनिकांनी स्वीकारले आहे.

त्यामुळे आपण त्या सर्वांचे आभार व्यक्त करत आहोत. हा पक्षप्रवेश होण्यासाठी शहरप्रमुख प्रसाद रेळेकर व अन्य पदाधिकारी यांनी प्रयत्न केल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले आहे.

यावेळी पक्षप्रवेशकर्ते नगरसेवक विलास शिगवण म्हणाले की, दापोली शहराचा विकास व्हावा म्हणून आम्ही पक्षप्रवेश करत आहोत.

आमच्याबद्दल अनेकजण गैरसमज पसरवतील मात्र आम्ही फक्त विकासकामे नजरेसमोर ठेवून हा पक्षप्रवेश करत असल्याचे स्पष्ट केले.

ना. योगेशदादा कदम यांनी दापोली तालुक्यातील अनेक गावांमध्ये विकास केला आहे.

मात्र दापोलीत हा विकास खुंटला होता. आता दापोलीचा विकासही त्याच जोमाने होईल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

यावेळी नगरसेवक विलास शिगवण, अन्वर रखांगे, संतोष कळकुटके, मेहबूब तळघरकर, अश्विनी लांजेकर यांनी पक्षप्रवेश केला.

तसेच माजी नगरसेवक नम्रता शिगवण यांच्यासह प्रभूआळीतील अनेक कार्यकर्त्यांनी पक्षप्रवेश केला आहे.

या कार्यक्रमाला शहरप्रमुख प्रसाद रेळेकर, तालुकाप्रमुख उन्मेश राजे, किशोर देसाई, भगवान घाडगे, निलेश शेठ, राजेंद्र पेटकर, महिला आघाडीच्या रोहिणी दळवी, दिप्ती निखार्गे, ममता शिंदे, शबनम मुकादम, सुवर्णा खळे, युवासेनेचे सुमित जाधव यांच्यासह विविध मान्यवर व पदाधिकारी उपस्थित होते.