दापोली: महाराष्ट्रातील किनारी पर्यटनाला चालना देण्यासाठी आणि शाश्वत पर्यटनाचा विकास करण्यासाठी राज्य शासनाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. या अंतर्गत रायगड, रत्नागिरी आणि पालघर जिल्ह्यातील पाच समुद्रकिनाऱ्यांची जागतिक स्तरावर नामांकित असलेल्या ‘ब्लू फ्लॅग’ प्रमाणपत्रासाठी निवड करण्यात आली आहे.
कोकण किनारपट्टीचा सुनियोजित विकास करणे आणि पर्यटकांसाठी पर्यावरणपूरक सुविधा निर्माण करणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.
राज्य पर्यटन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव संजय खंदारे यांनी दिलेल्या माहितीनुसार, शासन सध्या या समुद्रकिनाऱ्यांच्या विकासासाठी आवश्यक असलेल्या पर्यावरण मंत्रालयाच्या परवानग्या आणि इतर मंजुरी मिळवण्याची प्रक्रिया पूर्ण करत आहे.
पुढील चार ते पाच महिन्यांत या किनाऱ्यांना हे प्रमाणपत्र मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
या योजनेसाठी रायगड जिल्ह्यातील नागाव आणि श्रीवर्धन, रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर आणि लाडघर, तर पालघर जिल्ह्यातील डहाणू येथील पार नाका अशा एकूण पाच समुद्रकिनाऱ्यांची निवड करण्यात आली आहे.
‘ब्लू फ्लॅग’ हे समुद्रकिनाऱ्यांची स्वच्छता, पर्यावरण व्यवस्थापन, सुरक्षा आणि पर्यटकांसाठी उपलब्ध असणाऱ्या दर्जेदार सुविधा या निकषांवर दिले जाणारे आंतरराष्ट्रीय स्तरावरील पर्यावरण पूरक प्रमाणपत्र आहे.
हे प्रमाणपत्र मिळाल्यामुळे या भागातील पर्यटनाला मोठी गती मिळणार असून जागतिक पर्यटन नकाशावर कोकणची ओळख अधिक ठळक होईल, असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे.
विकसित महाराष्ट्र आराखड्यांतर्गत आगामी काळात दरवर्षी आणखी तीन ते चार किनाऱ्यांचा या कार्यक्रमात समावेश करून किनारपट्टीच्या पायाभूत सुविधांचा विकास करण्याचे शासनाचे उद्दिष्ट आहे.

