दापोली : तालुक्यातील आदिवासी वाडी-वस्त्यांमध्ये युवा मोरया सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
तीन दिवस चाललेल्या या मोहिमेअंतर्गत गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप, नागरिकांना छत्र्यांचे वाटप, तसेच जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण व पर्यावरण जनजागृती असे बहुविध कार्यक्रम राबवण्यात आले.

या उपक्रमांना स्थानिक आदिवासी बांधवांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. मोठ्या संख्येने उपस्थित राहिलेल्या नागरिकांनी आणि विशेषतः ज्येष्ठ नागरिकांनी संस्थेच्या कार्यकर्त्यांनी अत्यंत कमी वेळेत केलेल्या नेटके नियोजन व प्रभावी अंमलबजावणीबद्दल समाधान व्यक्त केले.

हा संपूर्ण उपक्रम संस्थेचे मार्गदर्शक श्रीराम महाडिक गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरीत्या पार पडला. या प्रसंगी वडवली-मटवण ग्रामसेवक अर्चना टाकळे, दत्तात्रय येळकर पाचवली, बाबासाहेब महाडिक, संतोष महाडिक, विनायक सावंत, प्रकाश महाडिक, स्मिता गिम्हवणेकर, सुषमा शिंदे, अल्पेश निकम, नामदेव पवार, प्रकाश पवार आणि विलास कलमकार यांची प्रमुख उपस्थिती होती.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहकार्य करणारे सर्व ग्रामस्थ, पदाधिकारी, स्वयंसेवक तसेच देणगीदारांचे युवा मोरया सामाजिक संस्थेच्या वतीने आभार मानण्यात आले.


